= अर्जुनी मोर. येथे तालुकास्तरीय संविधान दिन थाटात साजरा
अर्जुनी मोर-अनुसूचित जाती – जमातीचे प्रवर्गाच्या अंतर्गत जातीनिहाय वर्गीकरण हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आरक्षणाचे हक्कदार असणाऱ्यांचे आरक्षण काढून घेऊन ते खुल्या प्रवर्गातील लोकांना देण्याचे षडयंत्र असल्याचे मत जे.एम.पटेल काॅलेज भंडाराचे प्रा. डॉ. प्रदीप मेश्राम यांनी व्यक्त केले.
ते तालुकास्तरीय संविधान समारोह समितीच्या वतीने अर्जुनी- मोर. येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुध्द, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विर भगवान बिरसा मुंडा व अन्य महामानवांची पूजा करून संविधानाच्या सामूहिक उद्देशिकेच्या वाचनाने करण्यात आली. उद्देशिकेचे वाचन प्रदीप खोब्रागडे यांनी केले.
पुढे बोलतांना प्रा.प्रदिप मेश्राम म्हणाले संविधानात प्रवर्गाला आरक्षण दिले आहे, जातीला नाही. त्यामुळे एस.सी., एस.टी. प्रवर्गातील सर्व जातीत प्रवर्गाच्या आधारावर आरक्षण असल्यामुळे ते प्रवर्गाच्या आधारावर संघटित होत होते, त्यांच्यात बंधुत्वाची भावना निर्माण होत होती. प्रवर्गाच्या अंतर्गत जातीच्या आधारावर आरक्षण देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यामुळे एस.सी., एस.टी. प्रवर्गातील बंधुतेची व संघटनेची भावना लोप होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विचार मंचावर संविधान समारोह समितीचे अध्यक्ष सोनदास गणवीर हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते म्हणुन डॉ. कविता मते , भगवान मुंडे , संयोजक यशवंत सोनटक्के, बाळू नेवारे, लक्ष्मीकांत मडावी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, शालीकराम सहारे, नगरसेविका शीलाताई उईके, पंचायत समिती सभापती सविताताई कोडापे, पंचायत समिती सदस्य भाग्यश्री सयाम हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी डाॅ.प्रा.कविता मते,भगवान भोंडे यांनीही यांनी आपले विचार व्यक्त करतांना राष्ट्राचा विकास आणि समाजाचा विकास आणि भवितव्य हे संविधानाचे अंमलबजावणीशी जुळलेले आहे. म्हणून संविधान हे आपल्या सर्वांगीण प्रगतीचा दस्तऐवज आहे. दुसऱ्या विश्व युद्धानंतर अनेक देशाने आपले संविधान निर्माण केले. त्यातील काही रखडत रखडत चालत आहेत. तर काही आज अस्तित्वात नाहीत. जेव्हा की भारतीय संविधानाने अनेक संकटांना मात देऊन आपल्या सोबतच राष्ट्राचे अस्तित्व व एकसंघत्व टिकवून ठेवणे हे संविधान गतिमान आणि सक्षम होण्याचे स्वयं सिद्ध प्रमाण आहे. भारतीय संविधानामुळे भारत देश आज प्रगतीपथावर जात आहे. त्यामुळे तमाम भारतीयांनी भारतीय संविधानाचे मूल्य जोपासणे अत्यंत गरजेचे आहे.
अध्यक्षीय भाषणात बौध्द धम्माचे गाढे अभ्यासक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनदास गणवीर यांनी भारतिय संविधान म्हणजे प्रत्येक भारतियांचे प्रगतीचे माध्यम आहे.देशातील तमाम बहुजन मागासवर्गीय समाजातील नागरीकांचे उज्वल भविष्य संविधानातच दडलेले आहे. भारतातील प्रत्येक नागरिक हा संविधानाचे उद्देश नागरिकांचे कर्तव्य अधिकार इत्यादी बाबतीत जागरूक असला पाहिजे. अन्यथा वास्तविक लोकशाही स्थापित होणार नाही.असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला तालुक्यातील अनुसूचित जाती,जमाती व ओबीसी प्रवर्गातील हजारो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप खोब्रागडे, डॉ. प्रदीप भानसे, प्रभुदास मेश्राम, महेंद्र नंदागवळी, सत्पुरुष शहारे, नागेंद्र खोब्रागडे, सोनदास गणवीर यांनी कठोर परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन अमरदीप मेश्राम व किरणताई शहारे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार पुनाराम झगझापे यांनी मानले. शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.