अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे )-राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान विधानसभा सदस्य राजकुमार बडोले यांनी वरळी येथील माता रमाई स्मारकास भेट दिली. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष अमोल साळुंखे यांनी बडोले यांचे सह अनेक कार्यकर्त्यानी त्यांचे स्वागत केले.
माता रमाई यांचे देहावसान 27 मे 1935 रोजी झाले. तेव्हा राजगृह, दादर येथून माता रमाई यांची अंत्ययात्रा वरळी स्मशान भुमी येथे झाली. वरळी स्मशान भुमी येथील ज्या जागेवर माता रमाई यांचे अत्यंविधी करण्यात आला त्या जागेवर वरळी येथील माता रमाई भिमराव आंबेडकर स्मारक प्रतिष्ठान ने सन 2008 पासून माता रमाई स्मारकाची मागणी केल्याने 27 मे 2010 रोजी स्मृतीदिनी माता रमाई यांचा अर्धाकृती पुतळा प्रतिष्ठानच्या वतीने बसविण्यात आला. तेव्हा पासून सदर स्मारकाला वेगाने प्रसिध्दी मिळाल्याने देशभरातून व राज्यातून अनेक अनुयायी हे 27 मे या स्मृती दिनी माता रमाई यांच्या स्मारकावर नतमस्तक होण्यासाठी मोठया संख्येने येत असल्याने बृहन्मुंबई महानगरपालीका या स्मारकाची योग्य ती काळजी व देखभाल करत आहे.
विशेष म्हणजे राजकुमार बडोले हे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री असतांना सन 2015 साली डॉ. आंबेडकर यांच्या 125 वी जयंती निमित्त 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यात राज्यातील 100 बौध्द स्थळांचा विकास या कार्यक्रमामध्ये वरळी येथील माता रमाई स्मृती स्मारकांस 25 लाख रुपये निधी मंजूर केला होता. मात्र समाज कल्याण विभागाने सदर चा निधी बृहन्मुंबई महानगरपालीकेकडे वर्ग केला होता मात्र समाज कल्याण विभाग व पालीका यांच्यात समन्वय नसल्याने व जागेसदंर्भात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सदर निधीचा विनियोग योग्य प्रकारे झाली नाही.
माता रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल साळुंखे यांनी आमदार राजकुमार बडोले यांचेकडे माता रमाई यांचे वरळी येथे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी केली असून आपण मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या समन्वयाने शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे संगितले.
माता रमाई प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे माता रमाई यांचे वरळी येथे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी केली होती तेव्हा एकनाथ शिंदे व मुंबई शहर पालकमंत्री केसरकर यांनी सदर स्थळास भेटी दरम्यान पाहणी करुन महानगरपालीका व नगर विकास विभागाच्या मदतीने लवकरच योग्य तो आराखडा तयार करुन स्मारक उभे केले जाईल असे आश्वासन प्रतिष्ठानला दिले होते.