गोंदिया,दि.१०– गेल्या महिन्याभरापासून बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळलाय. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. दरम्यान हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा आता भारतभर रोष दिसून येत आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोधात गोंदियात सकल हिंंदू समाजाच्यावतीने मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, जैन आणि अन्य अल्पसंख्यकांवर होणारे हल्ले, त्यांच्या हत्या आणि उत्पीडनाच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने 10 डिसेंबर रोजी शहरातील जयस्तंभ चौकातून बाईक रॅली काढण्यात आली.ही बाईक रॅली शहरातील प्रमुख मार्गाने रॅली भ्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचल्यानंत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांना पाठविण्यात आले. सकल हिंदू समाजाच्या पदाधिकार्यांनी सांगितले, इस्कॉन आणि आर्ट ऑफ लिविंग या संस्थेने 1971 च्या दुष्काळात लाखो बांगलादेशी नागरिकांना चार महिने भोजनदान केले. त्याच इस्कॉनच्या चिन्मयदास प्रभूंना बांगलादेश पोलिसांनी राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. त्यांना कायदेशीर मदत मिळू नये म्हणून त्यांच्या वकिलाचीही हत्या केली. बांगलादेशात अराजकता माजवून हिंदू, बौद्ध, जैन व इतर अल्पसंख्यांकावर अन्याय-अत्याचार केला जात आहे. या विरोधात शहरात 22 सप्टेंबर रोजी भव्य रॅली काढून विविध मागण्यांसंदर्भात निवेदनही केंद्र शासनाला पाठविण्यात आले होते, यानंतरही यावर शासनाने योग्य ती पावले उचललेली नाही. केंद्र शासनाने बांगलादेशात होणार्या हिंदू व अल्पसंख्यांकावरील अत्याचाराविरोधात योग्य ती पावले उचलावी, बांगलादेशातील सरकारवर दबाव बनवून तेथील हिंदू व अल्पसंख्याकांचे रक्षण करावे, यासाठी आज 10 डिसेंबर रोजी शहरातील प्रमुख मार्गाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत देवेश मिश्रा, हरीश अग्रवाल, सचिन मिश्रा, सुनील तिवारी, प्रीतम लिल्लारे वीरेंद्र बिसेन, विनोद हरीणखेडे, नितीन जिंदल, ओमप्रकाश मेठी, देवा यादव, लालू शर्मा, जय चौरसिया, मुन्ना उरकुडे, राजू जैन (छोटा), तिलक लारोकर, तोलाराम मनकानी, दयानंद आसवानी, अजय यादव, दिलीप चांदवानी, विनायक गजघाट आदींसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.