बुलढाणा: राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात हमखास मंत्रिपद मिळणार अशी खात्री ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या बाबतीत अगदी दूरवरच्या बुलढाणा जिल्हावासीयांना देखील होती. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या लाल दिव्याची देखील चाहत्यांना खात्री होती. मात्र भारतीय जनता पक्षाप्रमाणेच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित दादा गट) देखील राजकीय धक्कातंत्रचा वापर केला. या दोघांना मंत्रिपदाची संधी नाकारण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील समर्थकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. समता परिषदेच्या माध्यमाने राज्यभरात लोकप्रिय ठरलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्याने जिल्ह्यातही संताप व्यक्त होत आहे.
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्याप्रकरणी ओबीसी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा येथे आज सोमवारी, १६ डिसेंबर रोजी रास्तारोको केला. ओबीसी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही त्यांना डावलण्यात आले ओबीसींसाठी रस्त्यावर लढणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळातून बाजूला केल्याबद्दल संतप्त झालेल्या ओबीसी तथा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा येथे रास्ता रोको आंदोलन करून आपला विरोध प्रकट केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात विरोध दर्शवित जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान सिंदखेडराजा पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली.