गोंदिया, दि.20 : ‘पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प’ सन 2024-25 अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत 10 डिसेंबरला एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा भवभूती रंग मंदिर, कन्हारटोली, गोंदिया येथे संपन्न झाली.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांचे अध्यक्ष्ातेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला उपविभागीय कृषि अधिकारी देवरी मंगेश वावधने, उपविभागीय कृषि अधिकारी गोंदिया महेंद्र ठोकळे, कृषि विज्ञान केंद्र हिवराचे कार्यक्रम समन्वयक विशाल उभरांडे, विषय विशेषतज्ञ आर.डी.चव्हाण, कृषि उपसंचालक समाधान वाघमोडे, तंत्र अधिकारी मृदुला कोळी, सर्व तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक उपस्थित होते.
प्रारंभी कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले डॉ.पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यशाळेमध्ये रब्बी हंगामातील प्रमुख पीक हरभरा, गहू, जवस व करडई या पिकांवर येणारे किड रोग याचे वेळीच नियंत्रण होण्याकरीता व शेतकऱ्यांना किड रोगाबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्याकरीता तसेच किड रोगावरील सल्ला व उपाययोजना करण्याकरीता किड सर्वेक्षण चमुला प्रशिक्षीत करण्याकरीता सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हरभरा व तूर पिकावरील किड रोग सर्वेक्षण वेळेत करणे तसेच मागील वर्षी रोग व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेल्या क्षेत्रात तसेच वारंवार रोग व किडीचा प्रादुर्भाव होणाऱ्या क्षेत्रात रोग किडीच्या वाढीवर लक्ष केंद्रीत करुन प्रादुर्भावावर लक्ष ठेवणे व त्यानुसार सल्ला व उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा सल्ला दिला. तसेच योग्य निरीक्षणे नोंदविल्यामुळे किड व रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे सोईचे होईल असे सांगितले.
यावेळी कृषि विज्ञान केंद्र हिवराचे कार्यक्रम समन्वयक विशाल उभरांडे व विषय विशेषतज्ञ आर.डी.चव्हाण यांनी हरभरा व तूर पिकावरील रोग किड व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. कृषि पर्यवेक्षक जितेंद्र मेंढे यांनी ‘एम क्रॉपसॅप’ ॲप वापराबाबत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि अधिकारी पवन मेश्राम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कृषि उपसंचालक समाधान वाघमोडे यांनी मानले.