अनिकेत आणि समीक्षा आमटे यांना यंदाचा जिल्हा गौरव पुरस्कार जाहीर

0
44

गडचिरोली : कर्मयोगी बाबा आमटे यांचा समाजसेवेचा वारसा चालविणाऱ्या तिसऱ्या पिढीतील अनिकेत व समीक्षा आमटे या दाम्पत्याला गडचिरोली प्रेस क्लबचा जिल्हा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराचे वितरण येत्या 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

गडचिरोली प्रेस क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रेस क्लबचे नवनियुक्त अध्यक्ष अविनाश भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते आमटे दाम्पत्याचे नाव निश्चित करण्यात आले. लोकबिरादरीच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण क्षेत्रासह इतर सामाजिक योगदान देणाऱ्या अनिकेत आणि समीक्षा आमटे या दाम्पत्याला गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

समाजसेवेचा वारसा चालविणारी तिसरी पिढी

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी आनंदवन, डॉ.प्रकाश आमटे यांनी हेमलकसा आणि आता तिसऱ्या पिढीतील अनिकेत आमटे हे नेलगुंडा वसवण्यासाठी तयारी करत आहेत. अनिकेत हे लोक बिरादरी प्रकल्पात 2002 पासून संचालक म्हणून सेवारत आहेत. लोकबिरादरीच्या माध्यमातून आश्रमशाळा, बांबू हस्तकला केंद्र आणि लोक बिरादरी डेअरी चालविली जाते. ज्येष्ठ समाजसेवक डॅा.प्रकाश व डॅा.मंदाकिनी आमटे यांचे चिरंजीव असलेले अनिकेत आमटे आजोबा, आजीसह आई-वडीलांचा समाजसेवेचा वारसा जपत माडिया, गोंड जमातीच्या सर्वांगीन कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. पत्नी समीक्षा आमटे यांच्यासोबत त्यांनी अतिदुर्गम नेलगुंडा येथे शाळा सुरू केली आहे. अनेक गावांमध्ये तलाव निर्मिती करून त्या तलावात मत्स व्यवसायासाठी प्रोत्साहन देत जलसाठा वाढविण्यासह अनेक हातांना रोजगार देण्याचे काम ते करत आहेत.

समीक्षा गोडसे (आमटे) यांनीही सासरचे समाजसेवेचे व्रत निष्ठापूर्वक सांभाळले आहे. लोक बिरादरी प्रकल्पात त्या संचालक आहे. मास्टर ट्रेनर म्हणून सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षण, प्रेरक कार्यक्रम, मल्टीमीडिया सेंटरचा विकास, अॅड्रॅाईड आधारित शैक्षणिक ॲपची अंमलबजावणी, विकसित बहुभाषिक शिक्षण कार्यक्रम (मातृभाषेतून राज्यभाषा- माडिया ते मराठीत संक्रमण सुलभ करण्यासाठी) असे अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबविले आहेत. त्या अतिदुर्गम नेलगुंडा येथील साधना विद्यालयाच्या संचालिका आहे.