एकास अटक, नऊ पसार :लब्धप्रतिष्ठितांचा घोरपडीवर ताव

0
8

अमरावती,दि.19: घोरपड या वन्यजीवाचे मांस शिजवून पार्टी करणार्‍या लब्धप्रतिष्ठितांवर धाड घालून केवळ एका आरोपीला वनविभागाने अटक केली आहे. रविवारी रात्री २ वाजताच्या सुमारास पिंपळखुटा गावानजीकच्या संत्राबागेत हा प्रकार उघड झाला. मारोती सहदेव वाघमारे (६५) असे अटकेतील आरोपीचे नाव असून शेतमालक मनोज वसंत जगताप याच्यासह अन्य नऊ जण घटनास्थळावरून पसार झाले. वनविभागाने घोरपडीचे शिजविलेले मांस व अन्य साहित्य घटनास्थळावरून जप्त केले. आरोपींनी पाच ते सहा घोरपडीची शिकार करून मांस शिजविल्याचा अंदाज आहे.
उपवनसरंक्षक हेमंत मिना यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. वनविभागाच्या पथकाने मनोज जगताप यांच्या शेतशिवारात धाड टाकली. त्यावेळी तेथील संत्रावाडीत पार्टी सुरू असल्याचे वनकर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले.
वनकर्मचार्‍यांना पाहताच घोरपडीच्या मटणावर ताव मारणार्‍यांनी तेथून पोबारा केला. यावेळी वनकर्मचार्‍यांनी चौकीदार मारोती वाघमारे याला ताब्यात घेतले. शेतमालकांसह अन्य नऊ जण पसार झालेत. वनकर्मचार्‍यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता तेथे शिजविलेले मांस व हाडांचे काही तुकडे आढळून आले. घटनास्थळावरून मांस, हांडांचे तुकडे, कुर्‍हाड, सुरी, भांडे असे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणात वनविभागाने आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९७२ मधील कलम ९, ३९,(३) (अ) (ब) (क), ४४, (१), (बी), (३८(अ), ४९, ४९बी, (१) (बी) ५१ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. शिजविलेले ते मांस तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. याप्रकरणातील पसार झालेल्या अन्य आरोपींना अटक करण्याकरिता तीन पथके विविध भागांत रवाना झाली आहेत.