चक्रवर्ती राजाभोज महामंडळ स्थापन करा- आ. चरणसिंग ठाकूर यांनी उपस्थित केला औचित्याचा मुद्दा

0
328

नागपूर. राज्यात प्रामुख्याने वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या भोयर, पवार, पोवार समाजाकरिता ‘चक्रवर्ती राजा भोज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करावे, अशी मागणी काटोलचे भाजप आ. चरणसिंग ठाकूर यांनी केली. शुक्रवारी (दि. 20) त्यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत ही मागणी रेटून धरली.
भोयर, पवार समाजाचा अलिकडेच समाज मेळावा पार पडला. त्यात आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. त्याअनुषंगाने समाजबांधवांनी हालचाली केल्या. तसेच याअनुषंगाने आ. ठाकूर यांची भेट घेऊन सदर मागणी करण्यात आली. त्याची दखल घेत त्यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. विधानसभेत ठाकूर म्हणाले, भोयर पवार समाजाची संख्या 20 लाखांवर आहे. त्यामुळे इतर समाजाप्रमाणेच या समाजासाठीही आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. या माध्यमातून समाजासाठी विविध योजना राबवाव्यात, तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्राधान्य द्यावे, समाजाच्या व्यक्तींना अल्प दराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलबध करू द्यावे, समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने – साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, समाजाच्या कल्याणासाठी योजनांचे योग्य संचलन करून त्याचा अहवाल करावा आदीबाबत ठाकूर यांनी औचित्याचा मुद्दा मांडला.
…………….
काय होईल फायदा?
– शासनाकडून समाज घटकांसाठी प्राधान्याने यामार्फत अल्पदराने कर्जपुरवठा करणे
– समाजाला आर्थिक उन्नतीसाठी उद्योग उभारणीला चालना देणे
– शैक्षणिक कर्ज व व्याज परतावा योजना
– कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
– महिलांचे स्वावलंबन
– बचत गटासाठी आर्थिक हातभार, कर्जपुरवठा
– विविध महामंडळांच्या धर्तीवर बीज भांडवल योजना
………
इतर समाजाप्रमाणे लाभ द्या
गेल्या दीड वर्षात विविध जाती, जमातींसाठी 17 हून अधिक महामंडळ स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी, मेंढी विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अशी महामंडळे कार्यरत आहेत. त्यात आता जाती, जमातीच्या लोकसंख्येचा निकष ठेवून समाज महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चक्रवर्ती राजाभोज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी भोयर, पवार समाजाने केली आहे.
शिष्टमंडळाचे लोकप्रतिनिधींना निवेदन
चक्रवर्ती राजाभोज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या मागणीसंदर्भात अखिल भारतीय भोयर, पवार महासंघ, युवा भोयर पवार मंचसह समाजाच्या शिष्टमंडळाने कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. चरणसिंग ठाकूर, आ. सुमित वानखेडे, आ. विजय रहांगडाले यांच्यासह इतरही लोकप्रतिनिधींना दिले. यापूर्वी 8 ऑक्टोबर रोजी तत्कालिन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या मागणीचे पत्र देण्यात आले आहे. शिष्टमंडळात महासंघाचे अध्यक्ष डॉ. नामदेव राऊत, श्रावण फरकाडे, मधुकर चोपडे, कमलाकर चोपडे, वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरे, भाजपच्या वैद्यकीय आघाडी प्रदेश सचिव डॉ. प्रीती मानमोडे, प्रफुल्ल मानमोडे, भगवान बोवाडे, विजय गाखरे, विक्की बन्नगरे, अॅड. तुषार घागरे यांच्यासह समाजबांधवांचा समावेश होता.