गोंदिया,दि.२४ः-गोंदिया येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ मध्ये अभियंता पदावर कार्यरत असलेले तालुक्यातीलच लहीटोली येथील रहिवासी असलेले शिवरतन चुलपार हे २३ डिसेंबरला आपल्या कामाच्या ठिकाणी भेटीवर जात असतांना त्यांना अज्ञात चारचाकी वाहनचालकांंनी आपल्या गाडीत जबरदस्तीने घालून छत्तीसगडमधील रायपूर येथे नेऊन सोडल्याची घटना आज २४ डिसेंबरला उघडकीस आली आहे.सोमवारपासून बेपत्ता असलेल्या चुलपार यांचा मोबाईल सुद्दा बंद असल्याने नातेवाईकांना शोध मोहीम सुरु केली होती.त्यातच आज सकाळी १० वाजेच्या सुमारास चुलपारला छत्तीसगड राज्यातील रायपूर जवळील राष्ट्रीय महामार्गानजीकच्या परिसरात शुध्दीवर आल्यानंतर त्यांनी महामार्गावरील ट्रकला हात दाखवत लिप्ट मागितली.त्या ट्रकमध्ये बसल्यानंतर ट्रकचालकाच्या मोबाईलवरुन आपल्या नातेवाईकाला फोन करुन आपण ट्रकने येत असल्याची माहिती दिली.त्यानंतर ट्रक जिल्ह्याच्या सिमेवरील देवरी चेकपोस्ट येते पोचताच ट्रकचालकाने तेथील पोलिसांना माहिती देत चुलपार यांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून गोंदिया पोलिस विभागाचे अधिकारी त्यांना घेण्यासाठी नातेवाईकासोबत गेले आहेत.चुलपार पुर्णतःशुद्दीवर आल्यानंतरच त्यांच्यासोबत काय घटना घडली हे कळू शकणार आहे.