आठ केंद्रांवर ३१ ऑगस्टपर्यंत मतदारनोंदणी-मुख्याधिकारी पाटील

0
12

गोंदिया,दि.20 : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदार म्हणून सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. १ जानेवारी २0१६ पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले युवक-युवती मतदार म्हणून आपल्या नावांची नोंदणी करू शकतील. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी केले.ते नगर परिषदेच्या सभागृहात मंगळवारी (दि.१९) आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल तसेच प्रशासन अधिकारी सी.ए.राणे,श्री मिश्रा उपस्थित होते.
पाटील यांनी सांगितले, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे. त्यासाठी शहरात ८ ठिकाणी नोंदणी केंद्र देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या अधिक माहितीसाठी नगर परिषदेने एक व्हॉट्सअँप ग्रुपही तयार केला आहे. नगराध्यक्ष जायस्वाल यांनी यंदा प्रभाग रचना सतर्कतेने तयार केली आहे.प्रभाग रचनेवर ३५ आक्षेप आले असली तरिही त्यात आक्षेप कमी असून नागरिकांनी सल्ला व आपल्या अपेक्षा जास्त नोंदविल्या आहेत. मात्र प्रत्येक आक्षेपावर सुनावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी नगर परिषद लिपीक मुकेश मिश्रा यांनी मतदार नाव नोंदणी कार्यक्रमांतर्गत तीन प्रकारचे अर्ज वापरले जात असल्याची माहिती दिली. यात अर्ज क्रमांक ६ नाव नोंदणीसाठी, अर्ज क्रमांक ७ नाव वगळण्यासाठी तर अर्ज क्रमांक ८ दुरूस्तीसाठी वापरला जात असल्याचे सांगितले.

निवडणुकीसाठी ५५ लाखांची र्मयादा
येणार्‍या निवडणुकीसाठीच्या कामावर राज्य निवडणूक आयोगाने ५५ लाख रूपये खर्च करण्याची र्मयादा दिली आहे. हा खर्च नगर परिषदेच्या निधीतूनच करायचा आहे. मात्र काही अडचण आल्यास निधीची मागणी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करणार असल्याचेही मुख्याधिकारी पाटील म्हणाले. शिवाय येत्या २५ तारखेला सकाळी ११.३0 वाजता येथील म्युनिसिपल शाळेत उपविभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत ओळखपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजीत केल्याचे सांगितले.

आठ केंद्रात नोडल अधिकारी नियुक्त
मतदार नाव नोंदणीसाठी शहरात आठ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यात रेलटोली प्राथमिक शाळेतील केंद्रात रामदास कुराहे, मरारटोली प्राथमिक शाळेतील केंद्रात डी.पी.मेंढे, गणेशनगर प्राथमिक शाळेत विनोद मेश्राम, मालवीय प्राथमिक शाळेत ओ.पी.गुप्ता, एस.एस.गर्ल्स कॉलेजमध्ये अमोल सातपुते, धोटे बंधू महाविद्यालयात डॉ.जी.पी.गाडेकर, महावीर मारवाडी कनिष्ठ महाविद्यालयात जे.व्ही.बिसेन तर पी.पी.शिक्षण महाविद्यालयात कार्तिक दास हे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.