पेनगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील नक्षलवाद्यांचे स्मारक केले उद्ध्वस्त

0
123

गडचिरोली : भामरागड उपविभागाअंतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या पेनगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत पेनगुंडा ते नेलगुंडा मार्गावर गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी मृत नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक पोलिसांनी शनिवारी (दि.28) तोडून टाकले. पेनगुंडा मदत केंद्राच्या उभारणीआधीच त्या ठिकाणी सदर स्मारकाची उभारणी केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ते उद्ध्वस्त करण्यात आले.

अतिसंवेदनशील आणि अतिदुर्गम भाग असलेल्या भामरागड तालुक्यात बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून दूर आहेत. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणून माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी पेनगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली.

दरम्यान नक्षल स्मारकाबाबत गोपनिय माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाच्या बॅाम्ब शोधक व नाशक पथकासह (बिडीडीएस) विशेष अभियान पथकाच्या जवानांनी शोध अभियान सुरु केले. पेनगुंडा ते नेलगुंडा रोडवर माओवाद्यांनी बांधलेले स्मारक दिसून आले. बिडीडीएस पथकाने सदर परिसराची कसुन तपासणी केली. त्यानंतर विशेष अभियान पथकातील जवानांनी ते स्मारक उद्ध्वस्त केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्रेणिक लोढा, तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. माओवाद्यांच्या अशा स्मारकाला समाजात कुठेच स्थान नाही. त्यामुळे कोणीही असे बेकायदेशीर कृत्य करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले.