अहेरी : गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी जिल्हा बनविण्याची मागणी मागील 15 ते 20 वर्षांपासून केली जात आहे. पण या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागाच्या विकासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी जिल्ह्याची दोन भागात विभागणी करून अहेरीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने केली आहे.
संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, तालुका अध्यक्ष फारुक शेख, जिल्हा सचिव रतन दुर्गे यांच्यासह महेश अलोने, सचिव सुरेश दुर्गे, रोशन सय्यद, मिलिंद अलोने, अमोल अलोने, दीपक गुरनुले, नागेश तोरेम, अनिल पारधी, रामदास ओंडरे आदींनी यासंदर्भातील निवेदन दिले.
सिरोंचा ते गडचिरोली हे 220 किमी अंतर असल्याने नागरिकांना मुख्यालयी येणे-जाणे करण्याकरीता मोठा भुर्दंड सोसावा लागतो. अतिशय वाईट रस्ते असल्यामुळे सिरोंचा येथील नागरिकांना परराज्यातून फेरा घेऊन जावे लागते. हा त्रास कमी करण्यासोबत अहेरी भागाच्या विकासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्वतंत्र जिल्हा होणे गरजेचे असल्याचे प्रणय खुणे यांनी सांगितले.अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील नागरिकांच्या या मागणीला आता राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने बळ दिले आहे.