- तंबाखूजन्य पदार्थाची नशा करी जीवनाची दशा
गोंदिया, दि.३ : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे दरवर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो. ही बाब माहिती असतांना सुद्धा अशा पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही बाब घातक असल्यामुळे सुखकर जीवन जगण्यासाठी तंबाखुच्या दुष्परिणामाची प्रत्येकाला जाणीव असावी, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समिती व सनियंत्रण समितीची सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
सभेला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.अनिल आटे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संजय शिंदे, पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण चव्हाण, दंत शल्यचिकित्सक डॉ.अमोल राठोड, जिल्हा सल्लागार (एनटीसीपी) डॉ.ज्योती राठोड, राज्यकर अधिकारी नरेश मडावी, मनोवैज्ञानिक सुरेखाआझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या संध्या शंभरकर, आकृती थींक टूडे स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गुडधे व समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
कोटपा कायदा 2003 अंतर्गत तंबाखुजन्य अभियान राबविण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार शाळा-महाविद्यालयांपासून 100 मीटर परिसरात आढळणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थ विक्री दुकानदारांवर कोटपा कायदा 2003 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस व आरोग्य विभागाला दिले.
आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. आजही अनेक नागरिक गुटखा, खर्रा, तंबाखू, पानमसाला इत्यादीचे सेवन करीत असल्याने अशा प्रकारच्या वस्तुंवर बंदी घालण्यात आली असली तरी देखील सेवन केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने तंबाखूच्या दुष्परिणाबाबत लोकांचे समुपदेशन करुन व्यवनाधीनतेपासून परावृत्त केले तर मोठ्या प्रमाणात जनजागृती होवून मौखिक आजारांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
कोटपा कायदा 2003 अंतर्गत कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी, कलम 5 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी, कलम 6 (अ) नुसार अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनीय गुन्हा व कलम 6 (ब) नुसार शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी तसेच कलम 7 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या वेस्टनवर धोक्याची सूचना देणे बंधनकारक आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी जसे- दवाखाना, शाळा, महाविद्यालये, बस स्थानक, शासकीय-अशासकीय कार्यालये इत्यादी तसेच शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करतांना आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.अनिल आटे यांनी केले. गोंदिया जिल्ह्यात केटीएस गोंदिया, तिरोडा, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, नवेगावबांध, गोरेगाव व सालेकसा असे एकूण 7 तंबाखूमुक्ती समुपदेशन केंद्र आहेत. राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम मार्फत कोटपा कायदा 2003 अंतर्गत माहे जानेवारी ते डिसेंबर 2024 पर्यंत एकूण 145 लोकांवर दंडात्मक कार्यवाही करुन 21 हजार 580 रुपये वसूल करण्यात आले असून चलानद्वारे शासन जमा करण्यात आले आहे, असे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले.