वडेगाव बंध्या येथे सावित्रीबाई फुले जयंती थाटात साजरी
अर्जुनी मोर-भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे इथली गुलाम झालेली स्त्री आज शिक्षित झाली. महिला व समाज सुधारणेसाठी सावित्रीबाई फुले यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. साडीवर पडलेल्या शेणातंच नव्हे तर देहाचंही खतं झालं, आणि आज इतक्या वेली फुलल्या की प्रत्येक मुलीचे फुल झालं, फुले दांपत्यामुळे आजच्या स्त्रीला शिक्षिका, प्राध्यापिका, इंजिनियर, डॉक्टर, एस पी ,कलेक्टर ,कमिशनर ,शास्त्रज्ञ, प्रधानमंत्री, राष्ट्रपती ,आमदार, खासदार होता आलं.आज अनेक शासकीय व खाजगी कार्यालयात मोठ्या प्रमाणात महिला नोकरी करून आपला संसाराचा गाडा चालवीत आहेत . उद्योग व रोजगारातही महिलांनी मोठी क्रांती केली आहे, त्यामुळे आजच्या प्रत्येक महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाच आपला आदर्श मानावा, कारण सावित्रीबाई फुले यांनीच स्त्रियांना प्रकाशाची वाट दाखविली असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री रचनाताई गहाने यांनी केले आहे.
माळी समाज विकास संघटना वडेगाव बंध्या येथे आयोजित( ता. 3 ) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे 194 वी जयंती व बालिका दिन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रचनाताई बोलत होत्या. जयंती समारोहाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य तेजूकला गहाणे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून सौ हितेश्री साळवे, रजनी झोडे, सौ. व्ही. के. सुकारे, सौ. निर्मला घुटके, मंजुश्री खोब्रागडे, मनीषा नाकाडे, मृणाली झोडे, प्रियाताई धामट, अर्चना मेंढे, दुशिलाताई बोरकर ,कविता कुपरणे, अनिता गुरनुले, वंदना कुंभरे, श्वेता लोहंबरे व अन्य महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जयंती समारोहाचे औचित्य साधून कु. वैष्णवी घुगुस्कार, चिरं. वन्स बोरकर ,कुमारी अर्चना मेंढे यांचा माळी समाज संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विविध महिलांनी आपले विचार व्यक्त करताना सावित्रीबाई फुले यांच्या कार्य कर्तुत्वावर प्रकाश टाकून त्यांचे विचारातूनच आपली प्रगती साधण्याचे आवाहन केले. संचालन पूजाताई निमकर यांनी केले. यशस्वीतेसाठी माळी समाज संघटनेचे दूषण निमकर, भोजराज निमकर, गोविंदा गुरनुले ,जयप्रकाश मेश्राम, केवळराम गोटाफोडे, लहूपाल गुरनुले, बालाजी मोहरले, आदींनी विशेष परिश्रम घेतले.