एरंडा नैसर्गिक खत व औषधी प्रशिक्षण केंद्राला भेट
वाशिम, दि.११ जानेवारी-नैसर्गिक शेती ही पर्यावरणपूरक व टिकाऊ उत्पादन प्रणाली आहे जी रासायनिक खते व कीटकनाशकांवर अवलंबून न राहता निसर्गाच्या संतुलित प्रक्रियांवर आधारित असते. जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करणे आवश्यक आहे, कारण यामुळे मृदाचे आरोग्य, पाणी व्यवस्थापन, पर्यावरणाचे संरक्षण आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न यामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. जैवविविधता संवर्धनासोबतच हा दृष्टिकोन कृषी क्षेत्राला अधिक टिकाऊ व आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोलाचा ठरतो.असे प्रतिपादन
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ऍड. निलेश हेलोंडे यांनी केले. दि.१० जानेवारी मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील नैसर्गिक खत व औषधी प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली व संवाद साधून त्यांच्या समस्यांची माहिती घेतली.
भेटीदरम्यान नैसर्गिक पद्धतीने खतनिर्मिती, औषधनिर्मिती आणि जैविक शेतीच्या पद्धतींवर सखोल चर्चा झाली. केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांवर पर्याय म्हणून नैसर्गिक खत व औषधींच्या फायद्यांची माहिती दिली.
ऍड. निलेश हेलोंडे यांनी जैविक शेतीच्या प्रसारासाठी केंद्राच्या कार्याचे कौतुक करताना शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, यासाठी मिशनमार्फत सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. “जैविक पद्धतीने शेती केल्यास उत्पादनाचे आरोग्यविषयक लाभ आणि पर्यावरण संतुलन राखणे शक्य होईल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी वाशिम तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, मालेगाव तालुका कषी अधिकारी कैलास देवकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती निलेश ठोंबरे,कृषी पर्यवेक्षक धनंजय शितोळे आदी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील अनेक शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते. या भेटीनंतर शेतकऱ्यांनीही नैसर्गिक शेतीविषयी नवीन प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.
*जिल्हा प्रशासनाची घेतली आढावा बैठक*
वसंतराव नाईक मिशनचे अध्यक्ष ऍड. निलेश हेलोंडे यांनी विश्राम भवनात जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीदरम्यान चिया सिड, चारा लागवड शेतकऱ्यांच्या समस्या, दुष्काळ निवारण उपाययोजना, तसेच शेतमालाला योग्य हमीभाव देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी योजनांच्या अंमलबजावणीसाठी वेळेत कार्यवाही करण्याचे आश्वासन ऍड. निलेश हेलोंडे यांनी दिले. बैठकीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, उपजिल्हाधिकारी (रोहयो) कैलास देवरे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा , तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
बैठकीतील महत्वपूर्ण मुख्य मुद्दे:
पाणीटंचाई व सिंचन सुविधा वाढवण्याबाबत चर्चा,शेतमाल साठवण सुविधा निर्माण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अश्या सुचना जिल्हा प्रशासनाला यावेळी दिल्या.
जलसंवर्धनाच्या उपाययोजनांवर भर, शासन दरबारी नवीन प्रकल्पांची अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल असे श्री हेलोंडे यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी स्थिर व योग्य हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्नशील, स्थानिक बाजारपेठांमध्ये थेट विक्रीसाठी योजना आखण्याचा प्रस्ताव सादर करावा असेही सांगितले.
यावेळी जिल्हा प्रशासनाने मिशनकडून ठोस निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली.शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नवे मार्गदर्शन उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.