वाघाच्या तावडीतून वडसातील शेतकऱ्याची सुखरूप सुटका

0
87

देसाईगंज : वाघासारख्या अतिशय हिंस्र आणि ताकदवान प्राण्याच्या तावडीत सापडल्यानंतर जिवंत सुटका होणे जवळजवळ अशक्यच. पण जुनी वडसा येथील एका शेतकऱ्याच्या बाबतीत हे घडले. बेसावध असलेल्या त्या शेतकऱ्यावर वाघाने मागून हल्ला केला. पण लगतचे शेतकरी आणि गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे त्या वाघाला धूम ठोकावी लागली.

गणपत केशव नखाते (46 वर्ष), रा.जुनी वडसा असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. नखाते हे मकर संक्रांतीच्या दिवशी, मंगळवारी (दि.14) सकाळी 9 वाजताच्या सुमारास गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतावर गेले होते. शेतात काम करत असताना अचानक झुडूपातून एका मोठ्या वाघाने त्यांच्यावर मागून हल्ला केला. पण घाबरून न जाताा नखाते यांनी आरडाओरड करत वाघाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. त्यांची आरडाओरड ऐकताच परिसरातील शेतकरी तसेच मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त वैनगंगा नदीच्या तीरावर जात असलेल्या नागरिकांनी तिकडे धाव घेतली.

लोकांनी प्रसंगावधान राखत नखाते यांच्या दिशेने धाव घेताच वाघाने जुनी वडसा शेतशिवारातून कुरुड गावाच्या दिशेने धूम ठोकली. या हल्ल्यात गणपत नखाते यांच्या पाठीवरील खालच्या भागावर वाघाचा पंजा लागला. जखमी नखाते यांना नागरिकांनी तात्काळ देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे सहायक वनसंरक्षक विजय धांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी धोंडणे, वनक्षेत्र सहाय्यक के.वाय.कऱ्हाडे यांच्यासह इतर वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

माजी आ.गजबे यांनी घेतली भेट

दरम्यान माजी आ.कृष्णा गजबे यांनी जखमी गणपत नखाते आणि त्यांच्या कुटूंबियांची ग्रामीण रुग्णालयात भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. नखाते आणि गावकऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे त्यांनी कौतुक केले.दिनांक 13 जानेवारीला कोंढाळा ते रवी मार्गावर असलेल्या जंगल परिसरात रेल्वेमार्गाचे काम करणाऱ्या मजुरांना वाघाचे दर्शन झाले होते. त्यात वाघिणीसह तिची पिल्ले होती, अशी माहिती मजुरांनी दिली.जंगल परिसरात कुणीही जाऊ नये आणि जंगलालगत असलेल्या शेतावर जाताना हातात काठी धरून जावे. स्वतःची काळजी घेत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन सहायक वनसंरक्षक अधिकारी विजय धांडे यांनी केले आहे.