सार्वजनिक कामातून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न-मंत्री संजय राठोड

0
38
* बोडना येथील समाज मंदिराचे लोकार्पण
अमरावती, दि. 18 : गावापासून देशापर्यंतच्या विकासात समाज मोठे योगदान देते. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी जेही शक्य आहे, त्या सर्व बाबी प्राधान्याने करण्यात येतील. यात सार्वजनिक कामातून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
बोडना येथील चापालाल महाराज पुण्यतिथी, समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा व जाहिर सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बाबूसिंग महाराज, सुनील राणा, आशिष धर्माळे, श्याम देशमुख, दिलीपराव ठाकरे, देवानंद चव्हाण आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. राठोड यांनी, राज्य आणि देशभरात बंजारा समाज विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. समाजाला योग्य दिशा मिळवून देण्यासाठी शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून कार्य करीत आहे. समाजाच्या लहान घटकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. आज चापालाल महाराज पुण्यतिथी अणि समाज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने गावपातळीवरील कार्यक्रमात सहभागी होता आले.
आजच्या कार्यक्रमात समाज मंदिराच्या निमित्ताने विकासकामाला गावात सुरवात झाली आहे. समाजासाठी जेही शक्य आहे, ती मदत करण्यात येईल. तसेच समाजाचे तांडे आणि गाव याठिकाणाहून निमंत्रण आल्यास त्याठिकाणी प्राधान्याने उपस्थित राहण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामाध्यमातून समाजाची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमापूर्वी मंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचे फित कापून लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर श्री. राठोड यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहिर सत्कार करण्यात आला. पुष्पवृटीत श्री. राठोड यांचे स्वागत करण्यात आले. पारंपारिक बंजारा वेशभूषेत महिलांनी औक्षण केले.