आदिवासी बहुल मंगेझरी अंगणवाडीतील बालकांच्या सोबत बालपंगत भोजन…

0
259

तिरोडा,दि.१९ः तालुक्यातील सुकळी बिट अंतर्गत येत असलेल्या आदिवासी बहुल मंगेझरी अंगणवाडी केंंद्रात जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकार्यांंनी अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांसोबत जेवण घेण्याचा नवोक्रम उत्साहात पार पडला.

अनेक वर्षापासून बंद पडलेला उपक्रमाला पुनश्च सुरुवात करण्यात आले.सदर कार्यक्रम जिल्हा कार्यक्रम अधिकार्यांचे वाढदिवसानिमित्त 27 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.परंतु काही कारणास्तव त्या दिवशी रद्द करण्यात आलेला सदर कार्यक्रम १८ जानेवारीला घेण्यात आला. यावेळी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम,जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार कटरे,बालविकास प्रकल्प गोंदिया १ च्या श्रीमती शितल लाडके,देवरीचे बालविकास प्रकल्प अधिकारी अनिलकुमार पटले,तिरोड्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी विनोदकुमार चौधरी,पंचायत समिती सदस्य रिता पटले,श्रीमती टेकाम सरपंच ग्रामपंचायत मंगेझरी,श्री.पटले मुख्याध्यापक जि प शाळा मंगेझरी,श्री मसराम ग्रामविकास अधिकारी मंगेझरी,कनकलता काळे पर्यवेक्षिका बीट सुकळी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक पर्यवेक्षिका श्रीमती कनकलता काळे यांनी केले.पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन बीट तथा प्रकल्प तर्फे सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात चिमुकल्या बालकांसोबत सर्व पदाधिकारी व उपस्थित पाहुण्यांनी जेवण केले.जिल्हा कार्यक्रम अधिकारी कीर्तीकुमार कटरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंगणवाडीतील सर्व बालकांना लेखन उपयोगी साहित्य किट भेट स्वरूपात देत फळांचे वाटप केले.सभापती सविता पुराम यांनी बालकांना एक चांगला आहार देण्याची पद्धत या उपक्रमामुळे झाल्याने त्यांच्या मधला कुपोषितपणा दूर होण्यासाठी एक चांगला उपक्रम ठरू शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली.

कीर्तीकुमार कटरे यांनी सदर प्रकारचे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविणार असल्याचे सांगितले. मंगेझरी अंगणवाडी ही आदिवासी बहुल असल्यामुळे या उपक्रमाची सुरुवात याच अंगणवाडीपासून करण्यात आल्याचे स्पष्ट केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंगेझरी, कोडेबरा, घोटी, सुकडी ,गोविंदटोला येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले.