गोंदिया, दि.24 : ग्रामीण भागातील स्वयंसहायता समुहातील महिलांच्या कर्तुत्वाचे व कौशल्याचे आणि उत्पादित वस्तुंची प्रदर्शन व विक्री या हेतूने जिल्हास्तरीय पलाश मिनी सरस प्रदर्शनीचे आयोजन दिनांक 22 ते 26 जानेवारी दरम्यान सुभाष शाळेचे ग्राऊंड, गुरुनानक शाळेजवळ, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोरील पटांगण, गोंदिया येथे करण्यात आले असून प्रदर्शनीला जिल्हयातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून नागरिक उपयोगी असणाऱ्या मौल्यवान व दैनंदिन वापराच्या वस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत.
पाचही दिवस पलाश प्रदर्शनात, खास विदर्भातील ताजे तवाणे तडकेदार खाद्य पदार्थ, विदर्भातील तर्री पोहा, चना पोहा, पाटोळी, गावरान कोंबळीचे तडकेदार चिकन, मटण, विविध कलाकुसर, गोंडी पेन्टींग, बांबू कला, हातमागच्या वस्तू, पुरण पोळी, कपडे, ग्रामीण कला कुशल, लोणचे, पापड, कुरुड्या आणि खूप काही आहे या पलाश प्रदर्शनात या पहा व खरेदी करा. गोंदिया जिल्हयातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू व खाद्य पदार्थांचे भव्य दालनच आपण सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. या प्रदर्शनात लहान मुलांना खेळण्यासाठी बाल मंच आणि भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी सुध्दा आहे. विविध लोक कला, हास्य प्रदर्शन, संगीत मैफिल अशा एकाहून एक कार्यक्रमाची मालिकाच आहे. या जत्रेत आणि सर्वांसाठी गूड न्यूज म्हणजे या प्रदर्शनीला भेट देण्यासाठी मोफत प्रवेश आहे.
सदर आकर्षक प्रदर्शनीमध्ये एकूण 97 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे विविध संस्थांच्या व महामंडळाच्या वतीने भव्य दालन सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. यामध्ये संबंधित संस्थांच्या एकूण 176 महिलांचा समावेश असुन उमेद, महिला विकास महामंडळ (माविम) यांसारख्या संस्थातर्फे भव्य अशा प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्थांना शासनाकडून अनुदान प्राप्त झाले असून त्याचा वापर आवश्यक तसेच मौल्यवान वस्तु बनविण्यात करतात व आपली उजिविका चांगल्या प्रकारे सक्षम बनवितात. या प्रदर्शनीमध्ये गोंदिया जिल्हयातील एकूण 91 महिला बचतगटांनी सहभाग नोंदविला असून इतर जिल्हयातील 06 बचतगट सुद्धा समाविष्ठ झालेले आहेत.
या प्रदर्शनीच्या माध्यमातून नागरिकांना कौशल्यपूर्ण तसेच संसारापयोगी वस्तू खरेदी करण्यास वाव मिळत असून नागरिकांमध्ये आनंदमय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या पलाश मिनी सरस प्रदर्शनीत सहपरिवार सहभाग नोंदवून सदर प्रदर्शनीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट राज्य ग्रामीण्जीवनोन्न्ती अभियान (उमेद) गोंदिया द्वारे कळविण्यात आले आहे.