भंडारा, दि. 27: देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्रीय अभिमानाच्या मूलभूत मूल्यांना चालना देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने आयोजित वीरगाथा 4.0 उपक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील यथार्थ वासनिक याने विशेष कामगिरी केली आहे. २६ जानेवारी २०२५ रोजी, गणतंत्र दिनाच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याचा दिल्लीत सन्मान करण्यात आला. यथार्थच्या या उज्वल कामगिरीमुळे त्याला 26 जानेवारी 2025 रोजी दिल्लीतील कर्तव्यपथावरील गणराज्य दिनाच्या परेडचा भाग होण्याचा सन्मान मिळाला आहे.
यथार्थ जवाहर नवोदय विद्यालय, पाचगाव येथे दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. आपल्या या यशाने तो अत्यंत आनंदी आणि गौरव अनुभवीत असल्याचे त्याने सांगितले. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने वीरगाथा 4.0 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशभरातील विविध शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातील १०० विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये ६६ मुली आणि ३४ मुले सहभागी होती. त्यांना प्रमाणपत्र, पदक आणि ₹१०,००० रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
दिल्लीतील सन्मान समारंभात विविध प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमादरम्यान, मार्गदर्शन केले त्यात प्रामुख्याने परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार यांनी १९९९ च्या कारगिल युद्धातील त्यांचे प्रेरणादायी अनुभव सांगितले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात शौर्य, निस्वार्थता आणि प्रामाणिकपणाची मूल्ये रुजवण्याचे आवाहन केले. तरुण सहभागींना प्रेरणा देत ते म्हणाले, “खरे शौर्य केवळ युद्धातच नाही तर दैनंदिन जीवनात जे योग्य आहे त्यासाठी उभे राहण्यातही असते.” या सन्मान समारंभात प्रमुख पाहुण्यांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख अडमिरल दिनेश के. त्रिपाठी, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार, संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार, डॉ. समीर वी. कामत आणि उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमण्यम यांची उपस्थिती होती.
यथार्थला या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे शाळेतील कला शिक्षक आकाश आबटवार, वाहिद शेख आणि रुबीना शेख यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. जवाहर नवोदय विद्यालय, पाचगावच्या प्राचार्या उषा धारगावे यांनी सांगितले की, अवघ्या ७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या विद्यालयाने अल्पावधीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यथार्थने सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवला आहे. मागील वर्षी प्रेरणा उत्सवामध्ये त्याला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते. विद्यालयाच्या इतर उल्लेखनीय यशांमध्ये पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी AIIMS कोलकाता, IIT खडगपूर, NIT नागपूर आणि GMC नागपूर व गोंदिया अशा प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विद्यालयाचा देशभरात तिसरा क्रमांक आला होता. विद्यालयाची विद्यार्थिनी गीताई चांदेवर हिने CBSE बोर्डात शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर अव्वल स्थान पटकावले. विद्यालयात शिक्षणासोबतच खेळ, कला आणि विविध उपक्रमांवर भर दिला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते.
यथार्थच्या यशाबद्दल जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले. जिल्हाधिकारी आणि नवोदय विद्यालय पाचगावचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) रविंद्र सलामे, जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) रविंद्र सोनटक्के, JNV प्राचार्य उषा धारगावे, तसेच शिक्षक अजय अग्निहोत्री, राजेश येळणे, एम. सुधाकर, शिवाजी आवारी, वितुल रामटेके, निता मेश्राम, हेमंत गायकवाड, लता मानकर, एच.एस. सोरते, मनीषा ठाकरे, ज्योती, प्रतिभा बुंदेले, हितेश वाळके, नूतन कुमारी झा आणि इतर शिक्षक-विद्यार्थ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. यथार्थ वासनिकने मिळवलेले हे यश संपूर्ण भंडारा जिल्ह्यासाठी गौरवाचे आहे आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.