जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही-प्रा.डॉ.राजेश धनजकर

0
39
शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात स्नेहसंमेलन, पालक मेळावा व प्रबोधन कार्यक्रम उत्साहात साजरा
वाशिम, २७ जानेवारी: “वाचन म्हणजे विचारांचा विस्तार, आणि शिक्षण म्हणजे भविष्याचा पाया!” जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट, सातत्य आणि आत्मशिस्त महत्त्वाची असते, पण या सगळ्याचा खरा आधार वाचन आहे. ज्ञान हीच खरी शक्ती आहे, आणि शिक्षण हेच सर्व समस्यांवरचे प्रभावी औषध असल्याचा मूलमंत्र प्रा. डॉ. राजेश धनजकर यांनी दिला.
        “चांगल्या माणसांना शोधण्याऐवजी आपणच चांगले बना, जग तुम्हाला शोधत येईल”—हा विचार आयुष्यात स्वतःला घडविण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. तसेच, आळस, उदासीनता आणि ध्येयशून्यता टाळून परिश्रम आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याच्या प्रेरणादायी विचारांमुळे अनेकांना नवीन ऊर्जा मिळेल आणि ते आपल्या ध्येयाच्या दिशेने अधिक आत्मविश्वासाने वाटचाल करतील.असे प्रतिपादन प्रा.धनजकर यांनी केले.
      प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्रमांक १ व २ येथे स्नेहसंमेलन, पालक मेळावा व प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रख्यात प्रबोधनकार व साहित्यिक प्रा. डॉ. राजेश धनजकर बोलत होते.
      पुढे बोलतांना ते म्हणाले,जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. “ज्ञान ही शक्ती आहे” आणि “शिक्षण हेच सर्व समस्यांवरचे औषध आहे” या विचारांमध्ये प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देण्याची ताकद आहे.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष नाजूकराव भोंडणे, सेवा निवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. एम. बी. डाखोरे, सेवा निवृत्त उपविभागीय अधिकारी काशिनाथ बोके , आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार आनंदराव खुळे, रमेश मोरे, बाबाराव गोदमले यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री भोंडणे म्हणाले, “आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नव्हे, तर एक सशक्त समाज घडवणे महत्त्वाचे आहे. आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचा प्रसार होणे गरजेचे आहे. मुलींनी शिक्षणाच्या संधीचा पूर्ण लाभ घ्यावा आणि समाजात आत्मनिर्भर बनावे. शिक्षण हेच खरं शस्त्र आहे, जे दारिद्र्य, अज्ञान आणि अन्यायाशी लढण्याची ताकद देते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे, कारण ‘वाचनाशिवाय पर्याय नाही’, हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.”वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासना करा. अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
         कार्यक्रमात उपस्थित असलेल्या ईतर मान्यवरांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.यामध्ये प्रामुख्याने डॉ. एम. बी. डाखोरे यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाच्या महत्त्वावर भर देत, कठोर परिश्रम आणि सातत्याने यश मिळते असा संदेश दिला. काशिनाथ बोके यांनी स्वतःवर विश्वास ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट करत, “संकटांवर मात करून पुढे जाणाऱ्या व्यक्तीच इतिहास घडवतात,” असे सांगितले.
       आनंदराव खुळे यांनी वाचन आणि साक्षरतेचे महत्त्व सांगत, “वाचनाने व्यक्तिमत्त्व घडते आणि समाजाला दिशा मिळते,” असे मत व्यक्त केले. रमेश मोरे आणि बाबाराव गोदमले यांनीही विद्यार्थिनींना शिक्षण, कष्ट, आणि ध्येय निश्चित करण्यावर भर देत जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला.या सर्व मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थिनींना नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि यशासाठी आवश्यक दिशादर्शन मिळाले.
         *प्रबोधनातून जीवनदृष्टीचा संदेश*:
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या प्रेरणादायी स्नेहसंमेलन, पालक मेळावा व प्रबोधन कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीतेसाठी आयोजक गृहपाल अपर्णा देशमुख,उईके यांनी पुढाकार घेतला. संचालन गंगा करवते, स्वाती झळके, शुभांगी भोकरे आणि अंकिता शेळके यांनी केले. हा कार्यक्रम अकोला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.