बेटर गोंदियाच्या पुढाकाराने सामूहिक राष्ट्रगान,पाच हजारावर नागरिकांची उपस्थिती

0
44

गोंदिया : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बेटर गोंदिया यांच्या पुढाकाराने आणि विविध सामाजिक संस्थाच्या वतीने सामूहिक राष्ट्रगान हा उपक्रम शहरातील नेहरू चौक येथे घेण्यात आला. यात शहरातील पाच हजाराहून अधिक नागरिक यात सहभागी झाले होते. सामूहिक राष्ट्रगान आणि तिरंगा सन्मान यात्रेद्वारे जिल्ह्यातील स्थानिक सामाजिक आणि पर्यावरणीय मुद्द्यांवर जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नेहरू चौकात झालेल्या मुख्य कार्यक्रमा जिल्हाधिकारी प्रजित नायर आणि बेटर गोंदियाच्या सदस्यांनी उपस्थित नागरिकांना जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक राहण्याचे व त्यावर उपाय शोधण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण झाले. यानंतर दुपारी १२.१२ मिनिटांनी सामूहिक राष्ट्रगान करण्यात आले. यात सर्वांना सामाजिक एकजूट व सक्रिय सहभागाची शपथ देण्यात आली. बेटर गोंदिया व इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर प्रकाश टाकत त्यांच्या निराकरणासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व पटवून दिले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून नागरिकांना समाज कल्याणासाठी सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले. या उपक्रमाने फक्त राष्ट्रप्रेम जागृत केले नाही, तर सामाजिक समस्यांवर विचार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले.बेटर गोंदिया उपक्रमासासाठी  डॉ. विकास जैन, अपूर्व मेठी, सावन बहेकार, दिलीप जैन, तरुण मनुजा, विपलोव जयस्वाल, शैलेश अग्रवाल व टीम बेटर गोंदियाच्या असंख्य स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमात हजारो नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी सहभाग नोंदविला होता.
शहराच्या कल्याणासाठी हे घेतले संकल्प
मी गोंदियाला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी योगदान देईन.
मी नेहमी कचरा फक्त कचरापेटीत टाकणार आणि कचरापेटीतील कचरा फक्त कचरा उचलणाऱ्या गाडीतच टाकेन.
मी पॉलिथीन किंवा डिस्पोजेबल वस्तूंचा वापर केवळ अत्यावश्यकतेनुसारच करीन.
मी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणार, मी मद्यपान करून वाहन चालवणार नाही व वाहन चालविताना कधीही मोबाइलचा वापर करणार नाही.
मी ड्रग्ससारख्या भयावह व्यसनांपासून नेहमी दूर राहीन.
मी जबाबदार, सक्रिय आणि जागरूक नागरिक बनणार. ७मी नेहमी महिलांचा आदर करणार.