राज्य सरकारच्या सहकार विभागाचा निर्णय सामाजिक न्यायविरोधात
खेमेंद्र कटरे/ गोंंदिया,दि.३१ः गेल्या महिन्यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरभरती करण्यात आली.त्या पाठोपाठ आता गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकर भरतीची प्रकिया सुरु करण्यात आली आहे.या दोन्ही बँकाच्या भरतीमध्ये मात्र सामाजिक आरक्षण लागू करण्यात न आल्याने सहकार क्षेत्रातील बँकातून सामाजिक आरक्षण संपवण्याचे षडयंत्र शासनाच्यावतीने रचण्यात आल्याचे समोर आले आहे.
याऊलट भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भरती प्रक्रियेत सामाजिक आरक्षण कायम ठेवत पदभरती केल्याचे दिसून आले आहे.भंडारा जिल्हा बँकेने एसस्सी ९,एसटी ५,विमुक्त जाती ९,एसबीसी २,ओबीसी १४,ईडब्लूएस ३,एसईबीसी २ व खुल्या प्रवर्गात १८ जागा भरलेल्या आहेत.शेजारील जिल्हा बँकेत सामाजिक आरक्षण लागू असताना गोंदिया व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सामाजिक आरक्षण का नाही असा प्रश्न पडला आहे.
दरम्यान गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरतीत सामाजिक आरक्षण नाकारण्यात आल्याचे स्पष्ट होताच गोंदिया जिल्हा बहुजन समाज पक्षाच्यावतीने आज ३१ जानेवारीला उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फेत मुख्यमंत्री व सहकार मंत्री यांना निवेदन सादर करीत भरती प्रकिया रद्द करण्याची मागणी केली आहे.तसेच लवकरच याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता न्यायालयाच्या निर्णयानंतर विभागीय निबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार भरती करण्यात येत असल्याची माहिती दिली.मात्र यासंंदर्भातील सहकार निबंधकासह न्यायालयाचे कागदपत्र दाखवण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त करीत,यासंदर्भातील सर्व कागदपत्रेच बँकेच्या अध्यक्षाकंडे असल्याचे सांगितले..
तर दुसरीकडे नोकरीमध्ये असलेले सामाजिक आरक्षण संपविणारी देशातील पहिली बँक म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख निर्माण होत असल्याचे वक्तव्य राज्याचे माजी मंत्री, भाजपा नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरात सुरु असलेल्या आंदोलनस्थळाला भेट दिल्यानंतर केले होते.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून द्वितीय श्रेणी ५ ,लिपीक ४७ व शिपाई पदाच्या २५ अशा ७७ पदासांठी नोकरभरती केली जात आहे.याकरीता ३० जानेवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.मात्र या भरतीमध्ये ओबीसी(OBC), एससी(SC), एसटी, एनटी या प्रवर्गासाठी कुठलेही आरक्षण न ठेवता सरळ सरळ सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे विदर्भातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शिपाई व लिपिक पदाच्या 358 पदांसाठी नोकरभरती केली जात आहे.यामध्ये सुध्दा ओबीसी(OBC), एससी(SC), एसटी, एनटी या प्रवर्गासाठी कुठलेही आरक्षण ठेवण्यात आलेले नाही.
शासनाची गुंतवणूक नाही त्यां बॅंकांना सामाजिक आरक्षण नाही-विभागीय निबंधक
राज्यातील ज्या सहकारी बँकामध्ये शासनाची सरळ गुतंवणूक नाही किंवा शासनाच्या निधीचा लाभ मिळत नाही अशा बँकांना नोकर भरतीच्यावेळी सामाजिक आरक्षणातून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.त्यामुळे जिल्हा बँकेच्या नोकरभरतीमध्ये सामाजिक आरक्षण लागू होत नसल्याची माहिती विभागीय सहकार निबंधक प्रविण गायकवाड यांनी बेरार टाईम्स शी बोलतांना दिली.
ज्या बॅंकामध्ये सरकारचे भागभांडवल नाही तिथे सामाजिक आरक्षण नाही-सहकारमंंत्री बााबासाहेब पाटील
राज्यातील ज्या सहकारी बँकामध्ये सरकारचा सरळ भाग भांडवल दिला जात नाही,त्याठिकाणच्या काही बँकामध्ये नोकर भरती करतांना सामाजिक आरक्षण वगळण्यात आले आहे.मात्र यात राज्यातील पुर्णच बँकांचा समावेश नाही.परंतु सामाजिक आरक्षणाचा विचार करण्यासंदर्भात काय करता येईल यावर विचारमंथन करण्यात येईल अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी बेरार टाईम्सशी बोलतांना दिली.