*३ सुवर्ण आणि १ रौप्य पदक, आंतरराष्ट्रीय संशोधन महोत्सवात करणार मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व*
*पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सव (अन्वेषण )*
मुंबई, ३१ जानेवारी : भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार कामगिरी केली आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी ३ सुवर्ण पदक आणि १ रौप्य पदकांची कमाई करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ३० आणि ३१ जानेवरी २०२५ दरम्यान डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाने सादर केलेल्या ६ गटांपैकी ४ गटात प्राविण्य संपादन केले आहे. सामाजिक शास्त्रे, मानव्य विज्ञान आणि वाणिज्य व विधी; मूलभूत शास्त्रे आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखेत ३ सुवर्ण पदके आणि कृषी गटात १ रौप्य पदक विद्यापीठास मिळाले आहे. दोन दिवस चाललेल्या या संशोधन स्पर्धेत पश्चिम विभागीय क्षेत्रातून महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातील एकूण २३ विद्यापीठे या संशोधन महोत्सवात सहभागी झाली होती.
सामाजिक शास्त्रे, मानव्य विज्ञान आणि वाणिज्य व विधी गटात श्रीयास कांबळे, ओम बोथरे, ओमकार देसाई आणि आर्या झुंझारराव यांनी सादरीकरण करून सुवर्ण पदक प्राप्त केले. मुलभूत शास्त्रे गटात वैभव कदम आणि अक्षय परब यांना सुवर्ण पदक मिळाले. आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखेच्या गटात तनिशा कौर, यशकुमार दुबे, अक्षित सावलिया आणि यथार्थ वजीर यांना सुवर्ण पदक मिळाले. तर कृषी गटात श्रावणी वाडेकर यांना रौप्य पदक मिळाले.
भारतीय विद्यापीठ संघाच्या निर्देशानुसार (एआययु) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील नवकल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन ओळखून त्यांना संधी उपलब्ध करुन देणे, उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी संधीची उपलब्धता करुन देणे, संशोधनवृत्तीला बळ देऊन राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अधिकाधिक सहभागिता वाढविणे अशा महत्वाकांक्षी उद्देश्यासह २००८ पासून विद्यार्थी संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कृषी; मुलभूत शास्त्रे; अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान; वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र; सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी; व आंतरविद्याशाखीय संशोधन अशा सहा वर्गवारीतून या स्पर्धेत पोस्टर किंवा मॉडेल सादरीकरण आणि मौखिक सादरीकरण या दोन वर्गवारीतून स्पर्धकांना सादरीकरण करावे लागते. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी सर्व सहभागी आणि विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनसाठी विशेतज्ज्ञ म्हणून डॉ. शशिकुमार मेनन, प्रा. सुनिता शैलेजन, डॉ. मिनाक्षी गुरव, डॉ. भूषण लांगी, डॉ. रुपा राव, डॉ. मनिष देशमुख, डॉ. वैशाली निरमळकर, प्रज्ञा कोरलेकर, डॉ. दिलीप मोटवानी, डॉ. रसिका पवार, डॉ. ललिता मुतरेजा आणि डॉ. नैना साळवे यांनी काम पाहिले. तर विशेष कार्य अधिकारी म्हणून डॉ. मिनाक्षी गुरव आणि समन्वयक म्हणून डॉ. भूषण लांगी आणि चमू व्यवस्थापक म्हणून डॉ. मनिष देशमुख आणि डॉ. ललिता मुतरेजा यांनी काम पाहिले.