अर्जुनी-मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे )-तालुक्यातील अरततोंडी / दाभणा येथील दोन चुलत भावांचा गावाशेजारील तलावात बुडुन दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना आज ता.2 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान उघडकिस आली.मृतकांची नावे रितीक रुपराम पातोळे वय 13 वर्ष, दुर्गेश धनंजय पातोळे वय 13 वर्षे रा.अरततोंडी अशी आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील अरततोंडी / दाभणा येथील रितीक रुपराम पातोळे,व दुर्गेश धनंजय पातोळे हे दोन्ही चुलत भाऊ असुन 13 वर्ष वयाचे असुन गावातीलच जि.प.शाळेत इयत्ता सातवी मधे एकाच वर्गात शिकत होते.आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मौजमस्ती व खेळण्यामधे दंग होते.अशातच त्यांनी पिंपळगाव- अरततोंडी मार्गावर अगदी अरततोंडी गावाला लागुनच असलेल्या तलावात 2 फेब्रुवारीला सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान लहान लहान गोरे ( बैल ) धुवायला दोन्ही मुलं गेली होती.तलावात पाणी भरपुर असल्याने खोल पाण्यात गेले.त्यांना पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडुन दुर्देवी मृत्यु झाला.ही घटना दुपारी तिन ते चार वाजेच्या दरम्यान लक्षात आल्याने गावांत हाहाकार मचला.ही घटना गावात वा-यासारखी पोहचताच तलावावर गावक-यांनी एकच गर्दी केली.व गावक-यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पाहताच आईवडील व नातेवाईक व ग्रामवासियांनी एकच हंबरडा फोडला.दोन्ही मुलं आपल्या आई-वडील एक एक च असल्याने पातोळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.मृतक दोन्ही मुलं आपल्या शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणुन त्यांची ओळख होती .त्यांचा नुकताच 26 जानेवारी ला शाळेच्या वतीने हुशार विद्यार्थी म्हणुन सत्कारही झाला होता. दोन्ही मुलांच्या अकाली व दुर्दैवी मृत्यूमुळे गावात सर्वत्र शोक कडा पसरली आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी मार्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.