लोणार सरोवराच्या विकासकामांना गती द्या !पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

0
7
मंत्रालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक
बुलढाणा दि.१० : जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरात जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजे. यासाठी विकास कामांना गती देण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन, आणि विकास आराखड्यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिलेत. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, तसेच दूरदृष्यप्रणाली वरून बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, अर्कीयॅालॉजी विभागाचे अरुण मलिक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बघण्यासाठी सामान्य पर्यटकांसह संशोधन करणारे पर्यटकही जगभरातून मोठ्या प्रमाणावर येतात. संशोधनासाठी नासाचे शास्त्रज्ञ ही बराच वेळा येथे येत असतात. त्यामुळे योग्य सुविधा त्या ठिकाणी देण्यासाठी सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्याचे निर्देश मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिले. पर्यटन विभागाकडून दिला जाणारा विकास निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पर्यटक लोणार सरोवराकडे आकर्षित व्हावे यासाठी त्या ठिकाणी तारांगण, संग्रहालय, चिल्ड्रन पार्क, गार्डन एमटीडीसीचे रेस्ट हाऊसचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी दिल्या. तसेच या ठिकाणी पर्यटकांना सोयीचे व्हावे म्हणून रोपवेची सुविधा करता येईल का या संदर्भात संबंधित विभागांशी चर्चा करून काम सुरू करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या. तसेच इतर काही अडचणी असतील तर त्या स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सोडवण्याचे निर्देशही श्री.देसाई यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्याशी फोनवरून चर्चा करून विकासकामांना गती देण्याच्या सूचना केल्या.