
गोंदिया,दि.१३ः-: कचारगड हे देशभरातील आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. येथे आमच्या पूर्वजांचा वास आहे. या ठिकाणी देशातील १८ राज्यांतील आदिवासी भाविक लाखोंच्या संख्येने येतात. अशात या तीर्थक्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे.त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कचारगड विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांची सोयी सुविधा दृष्टिकोनातून कामाला सुरुवात केली जाईल.तसेच या विकास कामांचा आढावा घेण्याकरीता दर तीन महिन्यांनी येथे भेट देणार असल्याची अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे बुधवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कचारगड येथे पोहोचत दिवसभर विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला.त्यानंतर पत्रकारपरिषदेत बोलत होते.कचारगड हे आदिवासी समाजाची काशी असून या स्थळाच्या विकासाकरीता वनविभागाकडून जी अडचण होती,ती आता दूर झालेली आहे.त्या दृष्टीने पुढच्या यात्रेपर्यंत याठिकाणी सुंदर असा विकसित परिसर बघावयास मिळेल.सोबतच कचारगड येथे येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवास तसेच आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.या विकासकामांच्या संकल्प पुर्तीच्यावेळी महामहिम राष्ट्रपती यांनाही शुभारंभ करण्याकरीता आणण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला आमदार संजय पुराम,जनजाती समितीचे अध्यक्ष नाजुक कुंभरे,सचिव लोकनाथ तितराम आदी उपस्थित होते.
तर दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाला केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री दुर्गादास उईके, राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, माजी केंद्रीय मंत्री व खासदार फग्गनसिंह कुलस्ते, खासदार नामदेवराव किरसान, छत्तीसगड येथील खासदार भोजराज नाग, माजी खासदार अशोक नेते, आमदार परिणय फुके, आमदार संजय पुराम, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आमदार हिना कावरे, आमदार मरकाम, जि.प.सभापती लक्ष्मण भगत, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रजनी कुंभरे,सभापती अनिल बिसेन,मुनेश रहागंडाले,माजी सभापती मनोज बोपचे, जिल्हा परिषद सदस्या गीता लिल्हारे, विमल कटरे, छाया नागपुरे, अर्चना मडावी, सुनिता राऊत यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली.बुधवारी दिवसभर खासदार, आमदार यांनी या ठिकाणी हजेरी लावून आपल्या कुलदैवतांचे स्मरण केले.