अर्जुनी-मोर,ता. १६ फेब्रुवारी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून नेमणूक झालेल्या मौजा भिवखिडकी (ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) येथील उमेश मार्तंड कापगते यांचे गावी प्रथम आगमन झाल्यानिमित्त भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.
सदर स्वागत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गट) तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे उपस्थित होते. यावेळी उमेश कापगते यांचे वडील मार्तंड कापगते, आई तसेच संपूर्ण आप्तपरिवार, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उमेश कापगते यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गावातून फुलहार अर्पण करून, गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. डीजेच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी लोकपाल गहाणे यांनी गावातील युवकांना प्रेरित करताना सांगितले की, “उमेश कापगते यांनी अपार मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे. त्याचा आदर्श घेऊन गावातील युवकांनीही एमपीएससी परीक्षेत भाग घेऊन यश संपादन करावे.”या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी उमेश कापगते यांचे यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.