‘त्या’ आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्या,गोरेगावात निघाला मोर्चा

0
88

गोरेगाव,दि.२४ः– एका 17 वर्षीय युवतीची हत्या करून मारेकर्‍याने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील देऊटोला-बबई शेतशिवारात उघडकीस आली होती.अमानवीय कृत्याचा निषेध व पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, या मागणीला घेऊन तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवार 24 फेबु्रवारी रोजी गोरेगाव येथील तहसील कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चात सहभागी नागरिकांनी बॅनर, होर्डींग हातात घेऊन ‘त्या’ आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्या अशा घोषणा दिल्या. दरम्यान, तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गोरेगाव तालुक्यातील देऊटोला शेतशिवारात आरोपी शकील सिद्दकी याने 17 वर्षीय युवतीचा खून करून तिला जाळल्याची घटना 10 फेबु्रवारी रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आरोपीला अटक करून विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.दरम्यान, या घटनेचा सर्वच स्तरावरून निषेध नोंदविण्यात येत असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी तालुक्यातील विविध संघटना एकटवल्या असून आरोपीला जामीन न देता जलदगती न्यायालयात खटला चालविण्यात यावा, आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबास 50 लाख रुपये आर्थिक मदत व एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी, पीडित कुटुंबास पोलिस संरक्षण द्यावे.

सरकारी खर्चाने सुरक्षितस्थळी घर बांधून द्यावे आदी मागण्यांना घेऊन बहुजन सामाजिक विचार मंच, एससी एसटी कृती समिती, जेतवन बुद्ध विहार समिती, मैत्री महिला बहुउद्देशीय संस्था गोरेगाव, ओबीसी सेवा संघ गोरेगाव,ओबीसी अधिकार मंच,अहेले सुन्नत खिदमत सेवा समिती आदी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी गोरेगाव तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला. दुपारी 2 वाजताच्या सुमारास शहरातील ठाणा चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली.  या मोर्चात भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत डोंगरे, भाकपाचे राज्य कार्यकारीणी सदस्य हौसलाल रहांगडाले, डॉ. लोकेश तुरकर, वहाब बेग मिर्झा, सलिम खॉ पठान, प्रकाश पंचभाई, निसार पठाण, शैलेश जांभूळकर, किशोर मेश्राम आदी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.