गोंदिया, दि.24 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया या आरोग्य संस्थेस स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) टाटा विंगर रुग्णवाहिका भेट स्वरुपात प्राप्त झाली आहे. या उदार भेटीमुळे रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असून रुग्णांना जलद आणि सुरक्षीत वाहतूक मिळणार आहे.
रुग्णवाहिका हस्तांतरण कार्यक्रम नागपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे व रिता कुसुमाकर घोरपडे, तसेच उपअधिष्ठाता तथा प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ.अपुर्व पावडे, वरिष्ठ समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अरविंदकुमार सिंग, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक गोंदिया श्री. निमजे व पराग सांगोळे उपस्थित होते.
सदर रुग्णवाहिका ही आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून प्रवासादरम्यान आवश्यक वैद्यकीय सहाय्य पुरवण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना जलद प्रतिसाद मिळण्यास मदत होईल, तसेच रुग्णांसाठी अधिक आरामदायी आणि सुरक्षीत प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी बोलतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे म्हणाले, ही रुग्णवाहिकेची भेट आरोग्य संस्थेच्या रुग्णकार्याकरीता अत्यंत उपयुक्त ठरेल आणि रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यास मदत होणार आहे. टाटा विंगर रुग्णवाहिकेच्या समावेशामुळे गोंदिया आणि आसपासच्या परिसरातील लोकांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार असून यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचे ध्येय अधिक दृढ करेल असे त्यांनी सांगितले.