रुग्णसेवेचा लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी आभा कार्ड बनवून घेण्याचे आवाहन

0
11

 गोंदिया, दि.3 : रुग्णांमध्ये जागरुकता निर्माण करण्याकरीता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे रुग्णसेवेचा लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी रुग्णालयात येतांना आभा कार्ड सोबत आणण्याचे तसेच ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत आभा कार्ड बनविलेले नसेल त्यांनी आपल्या भागातील आशा सेविका किंवा जवळच्या सेतू केंद्रामार्फत आभा कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे यांनी केले आहे.

        आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांची नोंदणी आभा कार्डद्वारे करण्याबाबतच्या सूचना भारत सरकार व राज्य सरकार द्वारे प्राप्त झालेल्या आहेत.

        आभा कार्ड तुम्हाला तुमची वैद्यकीय माहिती डिजिटली साठवण्याचा पर्याय देते. तुम्ही ही माहिती कुठूनही मिळवू शकता. तुम्ही हॉस्पीटल किंवा डॉक्टरकडे जाता तेव्हा ते कार्डद्वारे तुमचा वैद्यकीय इतिहास तपासू शकतात. या कार्डमध्ये 14 अंकाची अद्वितीय संख्या आहे.

       आभा नंबर रुग्णांसाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह ओळख प्रस्थापित करेल, जी देशभरातील आरोग्य सेवा प्रदाते आणि देयकांकडून स्वीकारली जाईल. आभा (आयुष्यमान भारत आरोग्य खाते) पत्ता एक स्वयं – निवडलेले वापरकर्ता नाव आहे, जे रुग्णांना त्यांच्या आरोग्याच्या नोंदी डिजिटल पध्दतीने सुरक्षितपणे ॲक्सेस आणि संबंधित डॉक्टरसोबत शेअर करण्याची सोय उपलब्ध करुन देते. त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया रुग्णालयामध्ये आभा कार्डद्वारे रुग्णांची नोंदणी ऑनलाईन करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

        जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचे आभा खाते बनविण्यात आलेले आहे. सदर आभा प्रणालीचा लाभ घेण्यासाठी व आभा प्रणालीत नोंदणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल होतांना आभा कार्ड अथवा आभा  क्रमांकाबाबत माहिती रुग्णांना असणे गरजेचे आहे.

        आभा हेल्थ कार्डचे फायदे : या कार्डमुळे देशभरातील आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय उपचारांमध्ये सहज प्रवेश मिळतो. या कार्डद्वारे वैद्यकीय माहिती डिजिटल पध्दतीने संग्रहीत केली जाते. या कार्डमुळे डॉक्टर रुग्णाच्या संपूर्ण आरोग्याच्या माहिती मिळवू शकतात. या कार्डमुळे वैयक्तिक हेल्थ रेकॉर्ड ॲप्लिकेशन्ससाठी सोपे साइन-अप पर्याय मिळतो. या कार्डमुळे रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरुपात मिळते.

        आभा कार्डबद्दल अधिक माहिती : आभा कार्ड हे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत येते. सदर कार्ड हे डिजिटल हेल्थ कार्ड आहे. आभा कार्डवर रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले उपचार आदी माहिती साठविली जाते. आभा कार्ड हे एक अनन्य 14 अंकी ओळख क्रमांक आहे.