११ हजार व मुळ कागदपत्रे यादवरावांना मिळाली परत.
नवेगावबांध दि.६.माणुसकी हरवत चालल्या व स्वार्थांधात अंध होतं झालेल्या आजच्या समाजात प्रामाणिकपणा तसा कमी होत चालला आहे.परंतु ऐकावे ते नवलच याप्रमाणे वाहकाने ११ हजार रुपये रोख असलेला पर्स प्रवाशाला परत केला. या घटनेने आजच्या या कलियुगातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याची साक्ष वाहक पंजाब श्रीरामे यांनी पटवून दिली.विश्वास न बसणारी पण सत्य असणारी ही घटना आजही समाजामध्ये नवा आदर्श घालून देते.
होय आजही प्रामाणिकपणा जिवंत आहे,याचा प्रत्यय देते.
झाले असे ,नवेगावबांध येथील प्रभाग क्रमांक एक मधील रहिवासी यादवराव बोरकर हे साकोली आगाराच्या साकोली – संभाजीनगर या बसने २८ फेब्रुवारीला सकाळी खामगाव ला नोकरीवर असलेल्या मुलांकडे नातीच्या वाढदिवसानिमित्त
सपत्नीक गेले होते.खामगाव बस स्थानकावर ते उतरले.मात्र प्रवासा दरम्यान खामगांव पर्यंत त्यांची पर्स सीटवर पडले.त्यात मुळ कागदपत्रे व ११ हजार रुपये होते.घरी गेल्यावर त्यांना आपले पर्स हरवल्याचे समजले.
यातच ते ११ हजार रुपये रोख व कागदपत्रे गेली म्हणून निराश होऊन खामगावला घरी परतले होते. आजच्या काळात प्रामाणिकपणा काहीसा नाहीसा होत चाललेला आहे. दिवसेंदिवस मनुष्यातील प्रामाणिकपणा व माणुसकी हरवत चाललेली आहे. स्वार्थाधांपणा समाजात वाढत चाललेला आहे. सध्याची परिस्थिती पाहता आता हा पर्स आपल्याला मिळणार नाही,याची खात्री यादवराव बोरकर यांना पटली होती.
इकडे वाहक पंजाब श्रीरामे यांनी हा संदेश साकोली सोशल मिडीयाशी संलग्न असलेल्या एका व्हाट्सअप ग्रुपवर टाकला.तो मॅसेज सोशल मिडीयातून धडाधड शेयर झाला. नवेगावबांध येथे नजीकच्या पांढरवाणीचे रहिवासी असलेले वाहक नास्तिक सोनवाणे यांनी येथील आपल्या मित्रांना ही माहिती दिली.स्थानिक व्हाट्सअप ग्रुप व इतर समाज माध्यमावर हा मेसेज व्हायरल झाला.अखेर नवेगावबांधला त्यांच्या नातेवाईक एकनाथ बोरकर यांच्या पर्यंत हा मॅसेज ग्रुपवरून पोचला. त्यांनी आपल्या काकांशी संपर्क साधला.
इकडे यातच रात्री यादवराव बोरकर यांना अनोळखी नंबर वरून भ्रमणधणींवर फोन आला.बसचे वाहक पंजाब श्रीरामे यांना ती पर्स बस मध्ये सीटवर आढळले.त्यांनी पर्समधे पाहणी केली तेव्हा त्यांना यादवराव बोरकर राहणार नवेगावबांध यांचे अकरा हजार रुपये रोख व आधार कार्ड सारखे महत्त्वाचे कागदपत्र त्यामध्ये असल्याचे यादवराव बोरकर यांना सांगितले व त्यांनी खात्री पटवून घेतले.अन यादव बोरकर यांना आश्चर्याचा धक्का बसला..
यादरम्यान यादवराव बोरकर यांना आधार कार्ड वर असलेल्या मोबाईल क्रमांकावर वाहक पंजाब श्रीरामे यांनी यादवराव बोरकर यांना तुमचा पर्स व त्यातील 11000 रुपये महत्त्वाची कागद आपल्याला मिळालेले आहेत ते आपल्याकडे सुरक्षित आहेत,अशी माहिती दिली.श्रीरामे यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे काल दि.१ मार्च रोज शनिवारला साकोली परतीची परतीच्या प्रवासामध्ये खामगावला एक ते दीडच्या दरम्यान बस येईल व आपणास आपला पर्स परत करण्यात येईल.असे विश्वासाने सांगितले.
परतीच्या संभाजीनगर – साकोली ही बस खामगांव बसस्थानकावर दुपारी दीड दोन वाजेच्या सुमारास आली.
यादवराव बोरकर हेही गृहस्थ खामगाव बस स्थानकावर आले. ०१ मार्चला खामगांव बसस्थानक अधीक्षक श्रीमती तांबे, साकोली आगाराचे वाहक पंजाब श्रीरामे व चालक भुषण निखाडे यांनी ती पर्स यादव बोरकर यांच्या सुपूर्द केली. वाहक पंजाब श्रीरामे व चालक भूषण निखाडे यांचा प्रामाणिकपणा पाहून यादवराव बोरकर यांचे अंत:करण भरून आले.
क्षणभर त्यांचा विश्वासच बसेना. सामाजिक परिस्थिती प्रचंड बदलली असताना आजच्या या कलियुगातही वाहकाचा प्रामाणिकपणा पाहून यादव व त्या ठिकाणी उपस्थित प्रवाशांचे मन गलबलले.आजही स्वार्थानंदाने अंध झालेल्या समाजामध्ये, प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा साक्षात्कार यावेळी उपस्थितांना वाहक श्रीरामे व चालक भूषण यांच्या रूपाने दिसून आले.यादवराव बोरकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या या इमानदार वाहक पंजाब व चालक भूषण यांचे मनस्वी आभार मानून एस टी महामंडळा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
माणसाने माणूसकी जपली की देवही आपल्या सोबत कधीच वाईट करणार नाही.स्वकष्टाने कमावलेले जे असते,ते आपले असते.बाकी उर्वरित दुसऱ्यांचे असते. त्यामुळे आपले नसतानाही आपले म्हणणे हे माणुसकीला न शोभणारे आहे.आपल्या सेवा काळात असे अनेक प्रसंग आले.पण ज्याचे त्यांना परत करण्यातच मला नेहमी आनंद वाटत राहिला आहे.
– पंजाब श्रीरामे वाहक, बस स्थानक साकोली.
आजची सामाजिक परिस्थिती बघता माझे ११ हजार रुपये व पर्स मला मिळणार नाही. अशी मला खात्री होती. परंतु झाले उलटे,वाहक पंजाब श्रीरामे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल जनु काही मला त्याच्या रूपाने साक्षात्कार झाला.प्रामाणिकपणा आजही शिल्लक असल्याची खात्री झाली.
-यादवराव बोरकर,रहिवासी नवेगावबांध.