जलतारा योजना ही लोकचळवळ व्हावी-जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

0
15
वाशिम,दि.७ मार्च: जिल्हयात जलस्त्रोताचे प्रमाण पार कमी आहे. भौगोलिक परिस्थीती पाहता नविन नदी, तलाव निर्माण होणे शक्य नसल्याने उपलब्ध परिस्थीतीवर मात करून पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे आहे. शासनाने जलतारा योजना सुरू केली असून वाशीम जिल्ह्यामध्ये १० लाखापेक्षा जास्त शोषखड्डे शेतामध्ये जलतारा योजनअंतर्गत निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यापेक्षाही अधिक खड्डयाचे निर्माण व्हावे याकरीता जलतारा ही योजना लोकचळवळ होणे जरूरी असून यामध्ये शेतकरी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, प्रबोधनकार व प्रत्येकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.
    जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांची जलतारा प्रकल्पासंदर्भात आयोजीत बैठकीत त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प समन्वयक कैलास देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, आर्ट ऑप लिव्हींगचे डॉ. हरिष बाहेती, उद्योजक देवेंद्र खडसे पाटील, गिरीधारीलाल सारडा, बिजेएस व तरूण क्रांती मंचचे निलेश सोमाणी, समाजसेवक अविनाश मारशेटवार, विजय चव्हाण, प्रविण पटेल, बाळासाहेब मेहकरकर, शेख मोबीन, दिप पटेल, राधेश्याम मालपाणी, सौ. संगीता इंगोले, सौ. दिपा वानखेडे, सौ. वृषाली टेकाळे, अ‍ॅड. सुरेश टेकाळे, परवेजभाई, श्याम सवाई, पवनकुमार मिश्रा, नारायण सोळंके, सौ. अर्चना मेहकरकर, ज्ञानेश्वरी सोळंके, डॉ. मोनिका भागडे, डॉ. प्रकाश भागडे, डॉ. सुखविंदर ओबेरॉय, सौरभ जैन, सुदर्शन सरनाईक समवेत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी या योजनेचे महत्व पटवून दिले. सदर योजनेमुळे शेतकरी व ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येवून आर्थिक उत्पनामध्ये सुध्दा भरभराट होणार आहे. साधारणता एक जलतारा एका पावसाळयात ३.६० लक्ष लिटर पाणी जमिनी मुरवू शकतो, त्यामुळे जर जिल्हयामध्ये दहा लाख जलतारा शोषखड्डे निर्माण झाल्यास एकबुर्जीसारख्या ३० एकबुर्जी धरणासारखी क्षमता वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येकांने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. हरिष बाहेती यांनी वाशीम जिल्हयात ११ लाख १११ जलतारा निर्माण करण्याचा संकल्प केला. वाशीम जिल्हयामध्ये ग्राम लाडेगाव जलताराचे रोल मॉडेल होत असून याठिकाणी ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी समवेत प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ श्रमदानाव्दारे शोषखडे करणार आहेत. ग्राम धनज बु. येथे जलतारा प्रकल्पाच्या प्रचारासाठी व तळागळात योजना पोहचविण्यासाठी सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांच्यासमवेत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला आहे.
 जिल्हाधिकारी दररोज करणार श्रमदान
    जलतारा योजना ही लोक चळवळ व्हावी याकरीता जिल्हा प्रशासन पूर्णपणे कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी दररोज सकाळी ७ ते १० ग्रामस्थांसोबत श्रमदान करणार आहेत. ग्रामस्थांनी नियोजन केल्यास जिल्हाधिकारी प्रत्येक ठिकाणी या कार्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. स्कोच ऑर्डर आप मेरिट उपांत्य पेरीसाठी पात्र ठरल्याने त्यांचा सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.