लाडेगाव येथे जलतारा अभियानांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचे श्रमदान

0
20
वाशिम,दि.९ मार्च – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लाडेगाव येथे जलसंवर्धनासाठी जलतारा अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात मा. जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी स्वतः बैलगाडीतून शिवारात जाऊन महिलांसह श्रमदान केले. गावकऱ्यांनी एकत्र येऊन १३०० जलतारा खड्डे तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. उपस्थित होत्या. तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो) कैलास देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, तालुका कृषी अधिकारी भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, सरपंच अर्चना चक्रनारायण, उपसरपंच सुवर्णा लाड आणि ग्रामपंचायत सदस्य, कृषी विभाग, महसूल विभाग तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
महिलादिनाचे अनोखे रूप – श्रमदानातून जलसंवर्धन :
महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी जलतारा उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी महिलांसोबत श्रमदान करून त्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमात पवन मिश्रा, गजानन अमदाबादकर, कैलास देवरे सर, अर्चना चक्रनारायण यांनी मनोगत व्यक्त केले.
जलसंवर्धन क्षेत्रात लाडेगावचा आदर्श पायंडा
ग्रामस्थांच्या पुढाकाराने गावात जलतारा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. उत्कृष्ट कार्यासाठी रोजगार सेवक महेश सुरजुसे, आकाश सवाई, संजय कपाटे, सचिन सिदगुरू, निखील घोंगळे, पवन मिश्रा आणि श्याम सवाई यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखील धोंगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्याम सवाई (अध्यक्ष, सर्वधर्म मित्र मंडळ) यांनी व्यक्त केले.
लाडेगाव ग्रामस्थांचा संकल्प – १३०० जलतारा खड्डे
कार्यक्रमाच्या शेवटी लाडेगाव ग्रामस्थांनी १३०० जलतारा खड्डे तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा उपक्रम यशस्वी झाल्यास गावाच्या जलसंधारण क्षमतेत मोठी वाढ होईल आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होईल.
लाडेगावच्या ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल. महिलांच्या सहभागामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी झाला असून जलतारा अभियान ग्रामीण भागातील जलसंवर्धनासाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहे.