गडचिरोली : नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कवंडे येथे तब्बल एक हजार जवानांनी अवघ्या २४ तासात पोलीस मदत केंद्र उभारल्याने नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.
कवंडे हे गाव छत्तीसगड सीमेपासून केवळ दोनशे मीटर अंतरावर असल्याने नक्षलवादी येथून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करायचे. परंतु हे केंद्र उभारल्यामुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे.मागील तीन वर्षात गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड अबुझमाड सीमेवर सात पोलीस मदत केंद्राची स्थापना केली आहे.यातील भामरागड तालुक्यात येत असलेल्या नेलगुंडा, पेनगुंडा आणि कवंडे ही गावे नक्षलवाद्यांचे नंदवन म्हणून ओळखल्या जायचे. मात्र, गेल्या तीन महिन्यात या तीनही गावात गडचिरोली पोलिसांनी रस्ते, मोबाईल नेटवर्कसह पोलीस मदत केंद्र उभारून नक्षलवादाचे कंबरडे मोडले आहे. कवंडे येथून जवळ असलेल्या इंद्रावती नदीपासून छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्याची सीमा आहे. हा परिसर नक्षलवादी कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे.
सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1000 पेक्षा जास्त मनुष्यबळ, 10 जेसीबी, 09 ट्रेलर, 04 पोकलेन, 25 ट्रक व 10 डंपर इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली. तसेच पोलीस स्टेशनची उभारणी करतांना 02 दिवसांमध्ये पोस्टे नेलगुंडा ते पोस्टे कवंडे पर्यंत 06 कि.मी.चा कच्चा रस्ता तयार करण्यात आला.
त्यामुळे नदीवरील पुलाचे काम काही महिन्यांपासून रखडले आहे. कवंडे येथे पोलीस मदत केंद्राची स्थापना झाल्याने लवकरच हा मार्ग पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे नेलगुंडापासून कवंडेला जाण्यासाठी रस्ताच नव्हता. जवानांनी २४ तासात रस्ता बनवून सर्व साहित्य नेले.यावेळी घेतलेल्या जनजागरण मेळाव्यात गावाकऱ्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल,कमांडण्ट 37 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल दाओ इंजीरकान कींडो, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)एम.रमेश,अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम.व्हि.सत्यसाई कार्तिक,उप-कमांडण्ट (2आयसी) 37 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल सुजित कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड अमर मोहिते व पोलीस स्टेशन कवंडेचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोउपनि. मंदार शिंदे इतर अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासह गावकरी व जवान उपस्थित होते.