बटाणा गावात 4 कोटी रुपयांच्या निधीतून 33/11 केव्ही नवीन उपकेंद्र मंजूर

0
70

“क्षेत्राच्या विकासासाठी वीज व्यवस्था भक्कम करणे हा माझा संकल्प” – आमदार विनोद अग्रवाल

गोंदिया,दि.१२ः– विधानसभेच्या विकासाला चालना देत आमदार विनोद अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नांमुळे बटाणा गावात 4 कोटी रुपयांच्या निधीतून 33/11 केव्हीचे नवीन वीज उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे परिसरातील अनेक गावांमधील वीज संबंधित समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहेत.

आतापर्यंत रावणवाडी सेक्शन हा या भागासाठी वीज पुरवठ्याचा एकमेव स्रोत होता, मात्र तो सतत ओव्हरलोड राहत असल्याने निम्न दाब आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्या निर्माण होत होत्या. याचा परिणाम घरगुती ग्राहक, शेतकरी आणि छोटे व्यापारी यांच्यावर होत होता. विशेषतः शेतीसाठी पुरेशी वीज उपलब्ध होत नव्हती, ज्यामुळे पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असे. नवीन उपकेंद्रामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.

हे नवीन उपकेंद्र फक्त घरगुती ग्राहकांनाच नव्हे, तर शेती आणि लघु उद्योगांना देखील मोठा फायदा करून देणार आहे. शेतकऱ्यांना आता सिंचनासाठी अडथळा विरहित वीजपुरवठा मिळेल, ज्यामुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल. तसेच, लघु आणि मध्यम उद्योगधंद्यांना योग्य दाबाने वीज मिळणार असल्याने त्यांचे व्यवसायही सुरळीत चालणार आहेत.

उन्हाळ्यात दतोरा, चूलोद, टेमनी, बटाणा, बरबसपूरा, आसोली, मुंडीपार, इर्री, नवरगावकला, गुदमा, मोरवाही, नवरगावखुर्द या गावांमध्ये लोडशेडिंग आणि कमी दाबाचा मोठा त्रास होत असे. नवीन उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर या गावांना नियमित आणि पुरेसा वीज पुरवठा मिळेल, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

आमदार विनोद अग्रवाल यांचा संकल्प
या विकासप्रकल्पाबाबत बोलताना आमदार विनोद अग्रवाल म्हणाले – “गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि वीज व्यवस्था सुदृढ करण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील. हे नवीन उपकेंद्र शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांसाठी नवीन ऊर्जा घेऊन येईल.”या प्रकल्पाच्या तातडीने पूर्ततेसाठी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. या पुढाकारामुळे हजारो नागरिकांना थेट आणि अप्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.