गोंदिया – महाबोधी महाविहार केवळ एक पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळ नाही, तर ते संपूर्ण बौद्ध समुदायासाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या साठी २२ मार्च ला मैत्रिय बौध्द विहार भिमनगर गोंदिया येथून पुज्य भंते भंदन्त श्रध्दाबोधी महाथेरो , भन्ते धर्मकीर्ती, भंन्ते अमरज्योती, भंन्ते एस, भंन्ते पुण्यमिनी, व सोबत आर्याजी धम्मप्रभा, आर्याजी पंचशिला यांच्या नेतृत्वात विशाल क्रांती मोर्चा काढण्यात आला. नंतर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले, आणि सभेला भिख्खू संघाने मार्गदर्शन केले आणि पुढे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले. उपस्थित बौध्द बांधवांनी महाबोधी महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील आणि पुर्ण सहकार्य भिख्खू संघाला देणार असल्याचे हातवर करून सांगितले.
विस्तृत मागण्याचे निवेदन राष्ट्रपती, प्रधानमंत्री, आणि बिहार चे मुख्यमंत्री यांचे नावे तहसीलदार, गोंदिया मार्फत देण्यात आले.या क्रांती मोर्चात हजारो संख्येने बौध्द उपासक उपासिकां उपस्थित होते.
बिहारमधील बोधगया येथे स्थित महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. येथेच भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, त्यामुळे हे संपूर्ण बौद्ध जगतात सर्वात महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. मात्र, दुर्दैवाने या ठिकाणच्या व्यवस्थापनावर बौद्ध धर्मीयांना पूर्ण नियंत्रण नाही, हेच या आंदोलनाचे प्रमुख कारण आहे.
बिहार सरकारने 1949 मध्ये “महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949” लागू केला, ज्याद्वारे महाबोधी महाविहाराच्या देखरेखीचे आणि व्यवस्थापनाचे काम महाबोधी मंदिर व्यवस्थापन समिती (Bodh Gaya Temple Management Committee – BGTMC) कडे सोपवण्यात आले. या समितीत हिंदूंचे स्पष्ट वर्चस्व आहे.
महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949, यानुसार महाबोधी विहाराच्या व्यवस्थापन समितीमध्ये 4 हिंदू (महंत/ ब्राह्मण) आणि 4 बौद्ध (भिक्खू) सभासद असावे. तसेच या समितीचा अध्यक्ष “हिंदू”च असावा असाही नियम आहे.
*बौद्ध धर्मावर होणारे अतिक्रमण:*
या व्यवस्थेमुळे महाबोधी महाविहारात हिंदू धर्माचे कर्मकांड आणि विधी कायदेशीरपणे केले जातात, जे बौद्ध धर्मात निषेधार्ह आहेत. बौद्ध स्थळावर बौद्ध धर्माचे आचरण व्हायला पाहिजे, पण येथे हिंदू धर्माचरण घडते.
बरेच हिंदू लोक महाबोधी मंदिराला “शिव मंदिर” म्हणून चुकीची ओळख देत आहेत, पण इतिहास पाहिला तर स्पष्ट होते की हे शिव मंदिर नसून, सम्राट अशोकाने बांधलेले भगवान बुद्धांचे महाविहार आहे.
*महाबोधी मुक्ती आंदोलन – बौद्ध धर्मीयांची मागणी*
12 फेब्रुवारी 2025 पासून बिहारमध्ये ‘महाबोधी मुक्ती आंदोलन’ सुरू आहे. या आंदोलनात बौद्ध भिक्खू आणि उपासक महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण नियंत्रणासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे, परंतु त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
*बौद्ध धर्मीयांच्या प्रमुख मागण्या:*
1. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध धर्मीयांकडे द्यावे.
2. महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 मध्ये सुधारणा करावी आणि व्यवस्थापन समितीत फक्त बौद्ध धर्मीय असावेत.
3. समितीच्या अध्यक्षपदी हिंदू कलेक्टर असण्याची अट रद्द करून, बौद्ध धर्मीयांना अध्यक्ष होण्याचा अधिकार द्यावा.
4. महाविहाराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये कोणत्याही बाह्य धर्मीयांचा हस्तक्षेप थांबवावा.