मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कामगाराच्या उपचारासाठी मिळाली आर्थिक मदत

0
20
वाशिम,दि.28 :आर्थिक अडचणींशी झुंजणाऱ्या एका गरीब कामगाराच्या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळालेल्या दोन लाख रुपयांच्या आर्थिक मदतीने मोठा दिलासा मिळाला आहे.
शरद इंगोले हे मूळ वाशीम जिल्ह्यातील रहिवासी असून, उदरनिर्वाहासाठी पत्नी आणि पाच वर्षांच्या जुळ्या मुलांसह ठाणे परिसरात स्थायिक झाले होते. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांना किडनीच्या आजाराने ग्रासले होते. पैशांच्या कमतरतेमुळे उपचार घेणे शक्य नव्हते. अखेर पत्नी जया यांच्या आग्रहानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिऑन सिटी केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे किडनी प्रत्यारोपणाची गरज असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, सुमारे आठ लाख रुपयांचा खर्च ऐकून कुटुंब चिंतेत पडले.
खासदाराकडे धाव
या कठीण प्रसंगी जया यांनी स्थानिक खासदार संजय देशमुख यांच्याकडे मदतीची याचना केली. खासदारांनी तात्काळ पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे अर्ज करण्यास सांगितले. कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी शरद यांच्या दयनीय आर्थिक परिस्थितीची पडताळणी करून त्वरित पावले उचलली. परिणामी, निधीतून दोन लाख रुपयांची मदत मंजूर झाली. ही मदत म्हणजे कुटुंबासाठी आशेचा नवा किरण ठरली आहे. ही मदत मिळाली नसती तर आम्ही काय केले असते, हे सांगता येत नाही, अशी भावना जया यांनी व्यक्त केली.
२ एप्रिल रोजी शस्त्रक्रिया
येत्या २ एप्रिल रोजी शरद इंगोले यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून, पत्नी जया स्वतः किडनी दान करून पतीचे प्राण वाचवणार आहेत. या निस्वार्थ त्यागाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मदत मिळाल्यानंतर खासदार संजय देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि कक्ष प्रमुख नाईक यांचे पत्राद्वारे आभार मानले. संवेदनशील नेतृत्वामुळे एका गरीब कुटुंबाला आधार मिळाला, असे ते म्हणाले.