मुख्याध्यापिकेच्या जाचाला कंटाळून सहाय्यक शिक्षकाचा आत्मदहनाचा इशारा

0
180

भंडारा – समर्थ विद्यालय, लाखनी येथील सहाय्यक शिक्षक विकास देवराम वंजारी यांनी मुख्याध्यापिका श्रीमती विभावरी निखाडे यांच्या अन्यायकारक वागणुकीला कंटाळून येत्या ७ एप्रिल २०२५ रोजी शिक्षणाधिकारी कार्यालय, भंडारा येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करून आपल्या मनस्थितीचा खुलासा केला आहे.

विकास वंजारी यांची समायोजन प्रक्रियेनुसार १६ जानेवारी २०२५ रोजी देवी सरस्वती विद्यालय, शिंगोरी येथून समर्थ विद्यालय, लाखनी येथे बदली करण्यात आली. त्यांनी नियमितपणे अध्यापनाचे कार्य सुरू ठेवले असतानाही, मुख्याध्यापिका विभावरी निखाडे यांनी त्यांचे वेतन बिल काढण्यास टाळाटाळ केली. नियमानुसार समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन नव्या शाळेतून मिळणे आवश्यक असते, परंतु शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून आदेश येऊनही त्यांचे वेतन थांबवण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकारी रविंद्र सलामे, वेतन पथक अधिक्षक प्रभा दुपारे आणि मुख्याध्यापिका विभावरी निखाडे यांनी संगणमत करून आर्थिक अडचणीत टाकल्याचा आरोप वंजारी यांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, गृहकर्ज थकीत राहिल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, भंडारा शाखेने त्यांच्या घराचा लिलाव जाहीर केला आहे. तसेच, मुलांचे शिक्षण, आरोग्य, आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या निभावणे कठीण झाले आहे, असे त्यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.

शिक्षणाधिकारी कार्यालय, भंडारा यांनी समर्थ विद्यालयातील शिक्षकांचे वेतन तत्काळ सोडवण्याचे निर्देश दिले असतानाही, मुख्याध्यापिका निखाडे यांनी त्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात आवाज उठवत विकास वंजारी यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.या प्रकरणी शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे.