राष्ट्रीय क्षयरोग नियत्रंण कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल

0
84

गोंदिया,दि.०८ःराष्ट्रिय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात गोंदिया जिल्हा वर्ष 2024 मध्ये क्षयरोग नियत्रंण कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्यात राज्यात अव्वल ठरला आहे.राज्यातील सर्व जिल्ह्याचे केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशकानुसार क्षयरोग कार्यक्रम मध्ये केलेल्या कामानुसार रैंकिंग केले जाते. गोंदिया जिल्हा क्षयरोग विभागाने नव्वद गुण प्राप्त करुन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत विविध 14 निकषावरून कामांचे मूल्यमापन करण्यात आले.
7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित महाराष्ट्र आरोग्य सन्मान कार्यक्रमात क्षयरोग कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आरोग्य मंत्री  प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांच्या क्षयरोग पथकाने स्विकारले.यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आरोग्य सचिव डॉ.निपुण विनायक, सार्वजनिक आरोग्य सचिव वीरेंद्र सिंह,राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमोगोथू नायक उपस्थित होते.सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा क्षयरोग विभागाला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पारितोषिक स्विकारणार्या पथकाच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे व डॉ.देवदास चांदेवार,जिल्हा डी.आर.टी.बी.एचआयव्ही समन्वयक चंद्रकांत भुजाडे,वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक पवन वासनिक व भोजेंन्द्रकुमार बोपचे,वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक संजय भगवतकर व राजु मेश्राम,प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित मंडल यांचा समावेश होता.

विविध लक्षणेनुसार संशयित क्षयरोग आजाराचे रोगी शोधणे,शोधलेल्या संशयित लोकांचे आरोग्य संस्थेत थुंकी नमुने किंवा एक्स-रे तसेच विविध प्रयोगशाळा तपासणी मोफत करणे.क्षयरोग निघालेल्या रुग्णांना नि:शुल्क औषधोपचार सुरु करणे,औषधोपचार दरम्यान फॉलोअप ठेवणे,समुपदेशन करणे,निक्षय पोर्टलवर नोंदणी करणे,निक्षय पोषण योजनेचा लाभ देणे,रुग्णांचे दस्तावेज ऑनलाईन करणे,सहवासी लोकांचे तपासणी व औषधोपचार,टिबीग्रस्त लोकांना कुठल्याही औषधांचा आरोग्यावर दुष्प्रभाव न होवु देणे अशा विविध बाबींवर पर्यवेक्षण करण्यात आले.आदिवासी,नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त सीमा अशी जिल्ह्याची ओळख आहे.विविध आजार बळावलेले असतात.आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असतानाही जिल्हा क्षयरोग विभागाच्या टीमने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवुन हे यश संपादन केल्याने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती सुरेश हर्षे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी अभिनंदन केले आहे.
सदर सन्मान प्राप्त करताना सांघिक कार्यामुळेच हे शक्य झाले असुन जनजागृती, सर्वेक्षण व उपचार ह्या त्रिसुत्रीच्या जोरावर जिल्ह्याला यश प्राप्त झालेले आहे. जिल्हास्तरिय प्रशासकिय अधिकारी त्यात जिल्हाधिकारी प्रजित नायर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांचे सोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे यांचे मार्गदर्शनानुसार जिल्हा क्षयरोग विभागाचे वैद्यकिय अधिकारी तसेच आठही तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी यांचे उत्कृष्ट नियोजन सर्व वैद्यकीय अधिकारी यांचे प्लॅनिंग तसेच आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य विस्तार अधिकारी यांचे पर्यवेक्षण आणि गाव पातळीवरचे सैनिक आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहाय्यिका,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,फार्मासिस्ट,सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा सेविका यांनी लोकांना गुणात्मक सेवा दिल्याने व त्या कामांचे अहवाल करणारे डाटा एन्ट्री ऑपरेटर,तालुकास्तरीय कर्मचारी,राष्ट्रीय आरोग्य अभियान टिबी कार्यक्रम अंतर्गत एस.टी.एस.,एस.टी.एल.एस,टीबीएचव्ही.,पी.पी.एम.,कार्यक्रम समन्वयक,पर्यवेक्षक यांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केल्याने जिल्ह्याची रँकिंग प्रथम क्रमांकावर आली आहे.
     -डॉ.अभिजीत गोल्हार, जिल्हा क्षयरोग अधिकारी