शिस्तभंगाचा ठपका ठेवत वनपाल, वनरक्षक निलंबित;उपवनसंरक्षकांची कारवाई

0
3946

आलापल्ली : वनसुरक्षेबाबत गंभीर दिरंगाई, वरिष्ठांना चुकीची माहिती सादर करणे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाल्याने आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया यांनी दोन वनकर्मचाऱ्यांवर शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली. त्यात गोमणीचे वनपाल एन.टी.सिडाम आणि मुकडी टोला-1 चे वनरक्षक सचिन मस्के यांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, शंकर ढोलगे यांनी यासंदर्भात एक तक्रार मुख्य वनसंरक्षकांकडे केली होती. त्यांच्या आदेशावरून विभागीय वनअधिकारी (दक्षता) यांनी चौकशी केली. त्यात दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात अक्षम्य दिरंगाई केल्याचे नमुद करण्यात आले. त्यांनी आपल्या वनक्षेत्रात प्रत्यक्ष कर्तव्य निभावण्याऐवजी कागदोपत्री जबाबदारी निभावून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निलंबनाच्या आदेशानुसार सिडाम यांचे मुख्यालय आलापल्ली तर मस्के यांचे मुख्यालय पेरमिली येथे निश्चित करण्यात आले आहे. त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.