
आमगाव : तालुक्यातील चिरचाळबांध परिसरात अनेक क्रशर व डांबर प्लांट सुरु आहे. चिरचाळबांध पंचोल मुख्य चौकातून गौण खनिजाचे ४०.५० टन क्षमतेचे दररोज दीडशे ते दोनशे ट्रकची वाहतूक होते. परिणामी या रस्त्यांची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाळ्यात पाणी साचून खड्डे तयार झाले. परिणामी या मार्गावरुन ये-जा करणारे विद्यार्थी आणि गावकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जि.प. सदस्य हनुवत वट्टी यांनी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे यासाठी मागील चार वर्षापासून सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु अद्यापही संबंधित विभागाने याची दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. परिणामी विद्यार्थी आणि गावकऱ्यांची समस्या कायम आहे. दहेगाव-खुशिपार-चिरचाळबांध या रस्त्याचे श्रेणी वर्धन होऊन प्रजिमा ४५ व भजेपार-नवेगाव-किकरीपार रस्ता, इजिमा-४६, सा.क्र. ७/०० ते १२/५०० रस्ता बांधकाम व सिलेपार बुराडीटोला चिरचाळबांध-शिवणी किडंगीपार रस्ता दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित विभागाला त्वरित देण्यात यावे, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनातून दिला.
जिप अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, आमगाव पंसचे सभापती राजेन्द्र गौतम, जिप सदस्य हनवंत वट्टी, चिरचाळबांधचे उपसरपंच सुधीर पटले, खुर्शिपारच्या सरपंच चव्हान, बुराडीटोलाच्या सरपंच रिनाईत, सितेपारचे सरपंच बिसेन, पियुष, केवल भाजीपाले आदिंनी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची भेट घेत त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल अवगत केले. रस्त्याचे बांधकाम सीएसआर निधीतून करण्याची मागणी केली. यावर नायर यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.





