
गोंदिया,दि.२६ः जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक भागात साचले पाणी असून येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातही पाणी शिरले आहे.शहरातील अवंतीबाई चौक परिसरात पाण्याची निकासी न झाल्याने चौकात पाणी जमा झाले असून सहयोग रुग्णालयासह परिसरातील रस्त्यावर ३-४ फुट पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सुरक्षेच्या दृष्टीने शाळांना आजची सुट्टी जाहीर केली.गोंदिया(७५.८ मीमी),आमगाव(७४.५ मिमी) व सालेकसा(८४.०मिमी) तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात आज ५४.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गोंदिया तालुक्यातील ८ ही मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.आमगाव तालुक्यातील ४ मंडळ,सालेकसा तालुक्यातील ४ मंडळ,गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.देवरी तालुक्यातीच चिचगड मंडळात अतिवृष्टीची नोंंद करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात शुक्रवार, २५ जुलैच्या रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग काही तास सुरू असलेल्या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.जिल्ह्यातील अनेक शहरे आणि ग्रामीण भागात सखल परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले असून, आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.शहरातील अंडरग्राऊंड पुलपरिसरात ४-५ फुट पाणी साचले आहे.येथील मुख्य बाजार परिसर असलेल्या गोरेलाल चौकातील रस्त्यावरही पाणी साचले आहे.विशेष म्हणजे या गोरेलाल चौकातील दोन्ही बाजूला असलेल्या दुकानदारांनी नगरपरिषदेच्या नाल्यावर अतिक्रमण केल्याने पाण्याची निकासी होण्यास अडचण निर्माण झाली आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज शनिवार, २६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण संस्थांना बंद ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरला आहे.
दरम्यान, धरणांवरही अतिरिक्त दबाव टाळण्यासाठी कालीसरार, पुजारी टोला आणि धापेवाडा प्रकल्पांतून नियंत्रीत स्वरूपात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदी व नाल्यांच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ग्राम प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत संपर्कात असून, आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी सर्व उपाययोजना तयार ठेवण्यात आल्या आहेत.सततच्या पावसामुळे काही ठिकाणी रस्ते खचले आहेत, तर काही भागांत विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
बाई गंगाबाई महिला रुग्णालयात अशाप्रकारे पाणी साचल्याने रुग्णासहं रुग्णांच्या नातेवाईकांची ताराबंळ उडाली आहे.त्यातच सिव्हीलपरिसरातील हनुमानमंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावरही पाणी साचले आहे.
पुजारीटोला – (63.77%)
▪️गेट सुरु- 04 गेट 0.60 मी.
04 गेट 0. 90 मी.
▪️विसर्ग- 383.54 क्युमेक
बावनथडी – (27.33%)
▪️गेट सुरु- 0 गेट
▪️विसर्ग- 0.0 क्युमेक
संजय सरोवर – (71.34%)
▪️गेट सुरु- 01 गेट 01.25 मी.
▪️विसर्ग- 171.49 क्युमेक
गोसेखुर्द – (22.52%)
▪️गेट सुरु- 33 गेट 0.50 मी.
▪️विसर्ग- 3652.00 क्युमेक
धापेवाडा – (12.97%)
▪️गेट सुरु- 11 गेट 03.00 मी.
▪️विसर्ग- 2144.23 क्युमेक
कारधा पातळी –
▪️ईशारा पातळी- 245.00 मी.
▪️धोक्याची पातळी- 245.50 मी.
▪️ *सद्याची पातळी- 242.45 मी.*





