
गोंदिया,दि.०४ःमहाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी दि.३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबविण्याचा संकल्प सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला आहे.त्या अनुशंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यात दि.3 ते 15 ऑगस्ट पर्यंत “अंगदान जीवन संजीवनी” अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जाण्याचे मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.
दि.3 ऑगस्ट रोजी गोंदिया सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत के.टि.एस. सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांच्या हस्ते “अंगदान जीवन संजीवनी” अभियान ला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.दि.3 ऑगस्ट रोजी अवयवदान सायकलिंग प्रभातफेरी व शपथ घेण्याच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली.सायकलिंग प्रभातफेरी दरम्यान अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,नेत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चंद्रकिशोर पारधी,नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले/नागपुरे,नेत्र सहाय्यक रिता अरोरा,योगशिक्षिका मनीषा पशीने, सायकलिंग संडे ग्रुपचे मंजू कटरे व रवी सपाटे यांचे सह त्यांचे सायकलिंग ग्रुप सदस्य यांनी शहरात सायकलिंग प्रभातफेरीने विविध पोष्टरच्या माध्यमातुन अवयवदानाची जनजागृती करण्यात आली.यावेळी के.टी.एस. प्रागंणात अवयवदानाचा संकल्प घेवुन प्रतिज्ञा घेण्यात आली.
सायकलिंग संडे ग्रुपच्या माध्यमातून लोकांना अवयव दानाचे बाबतचे महत्व याबाबत नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले नागपुरे यांनी दिली व अंगदान साठी कार्य करणाऱ्या योगशिक्षिका मनीषा पशिने यांनी आपले अनुभव सांगुन अवयवदाना बद्दल माहिती दिली.
अवयवदान हि काळाची गरज असून प्रत्येक व्यक्तीने यासंबंधी माहिती जाणुन घेणे गरजेचे आहे.अवयवदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, तिचे अवयव (जसे हृदय, यकृत, मूत्रपिंड) आणि ऊती (जसे कॉर्निया, त्वचा) गरजूंना दान करणे, जेणेकरून ते त्यांचे जीवन जगू शकतील किंवा त्यांची दृष्टी परत मिळवू शकतील. हे एक अत्यंत महत्वाचे कार्य आहे, ज्यामुळे अनेक लोकांना जीवनदान मिळू शकणार असल्याची माहीती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी यावेळी दिली. मृत्यूनंतर देहदाता होण्याच्या इच्छेची नोंदणी आता गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या शरीरशास्त्र विभागात होते तसेच ऑनलाईन नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) च्या वेबसाइटवर एक फॉर्म भरूनही ती प्रक्रिया करू शकत असल्याचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी यावेळी सांगितले.





