गोंदिया-. नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणी व निवडणूक प्रक्रियासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी गुरुवारी (दि. २३) गोंदिया गेस्ट हाऊस येथे युवा ग्रॅज्युएट फोरमतर्फे मार्गदर्शन व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहुल हनवते आणि संस्थेचे सदस्य तसेच आयटी अभियंता धम्मानंद हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
राहुल हनवते यांनी पदवीधर मतदारसंघाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, पदवीधर वर्गाची मतदार म्हणून नोंदणी आणि सहभाग ही केवळ निवडणुकीपुरती बाब नाही, तर शिक्षित समाजाच्या प्रतिनिधित्वाची गरज आहे. तरुणांनी
पुढाकार घेत मतदार म्हणून नोंदणी करावी आणि सक्रिय भूमिका घ्यावी, असे सांगितले. आयटी अभियंता धम्मानंद म्हणाले की, नागपूर पदवीधर मतदारसंघ हे सुशिक्षित पदवीधरांचे हक्काचे स्वतंत्र व्यासपीठ आहे. या निवडणुकीत सामाजिक व शैक्षणिक पातळीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची संधी आहे. पारंपरिक राजकारणापेक्षा ही निवडणूक वेगळी असून, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी बॅलेट पेपरवर आधारित मतदान पद्धतीने
घेतली जाते. या निवडणुकीत मतदारांना एकापेक्षा अधिक उमेदवारांचे प्राधान्य अनुसार पर्याय उपलब्ध असतात, हे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाची सुरुवात बळीराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी अतुल सतदेवे, वसंत गवळी, सी. पी. बिसेन, यशवंत रामटेके, भोजराज ठाकरे, रवी भांडारकर, उमेश कटरे, सुशील गेडाम, अनिल गोंडाणे, पंचशीला पानतावणे, रोमेंद्र बोरकर, सुंदरलाल लिल्हारे, अरुण बन्नाटे, राजीव ठकरेले, मंगेश सतदेवे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अतुल सतदेवे यांनी सादर केले.
एकजुटीने या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
गोंदिया जिल्ह्यातून २५ हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचा संकल्प युवा ग्रॅज्युएट फोरमने केला असून, सर्व सामाजिक संघटनांनी एकजुटीने या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. मार्गदर्शन बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या नागपूर पदवीधर निवडणुकीची पार्श्वभूमी, त्यातील रणनीती, आणि युवकांचा वाढता सहभाग यावर सविस्तर चर्चा झाली. मागील निवडणुकीत युवा ग्रॅज्युएट फोरमचे अतुल खोब्रागडे यांनी तिसरा क्रमांक पटकावून निर्णायक भूमिका बजावली होती, हे यावेळी विशेष अधोरेखित करण्यात आले





