तिहेरी हत्याकांडाचा साडेतीन वर्षांनंतर तपास सीबीआयकडे

0
9
लाखनी (जि. भंडारा) – खेळण्याबागडण्याच्या वयात ६ ते ११ वर्षे वयोगटातील तीन बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखनी तालुक्‍यातील मुरमाडी/सावरी येथे १४ फेब्रुवारी २०१३ रोजी घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातदेखील खळबळ उडाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनेचा तपास योग्य दिशेने केला नसल्याचा नागरिकांचा आरोप होता. त्यामुळे तब्बल साडेतीन वर्षांनंतर या घटनेचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला. सीबीआयच्या पाच सदस्यीय चमूने  गुरुवारी लाखनीत भेट देत मुलींचे मृतदेह आढळलेल्या विहिरीची पाहणी केली.
 
तनुजा जयपाल बोरकर (वय ११), प्राची (वय ९ ) व प्रिया (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. घटनेच्या दिवशी तनुजा आईला शेतात हुरडा खाण्यासाठी जात असल्याचे सांगून बाहेर गेली. रात्र होऊनही ती परतली नाही. तिच्या दोन्ही बहिणीसुद्धा घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. गावातील नागरिकांच्या मदतीने सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. तक्रार केल्यावर पोलिसांनी दखलही घेतली नाही. दरम्यान, १६ फेब्रुवारीला तिन्ही बहिणींचे मृतदेह गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळले. त्यामुळे घटनेतील गांभीर्य वाढले होते. पोलिस विभागातील विशेष पोलिस महानिरीक्षकांपासून अनेक बडे अधिकारी लाखनीत डेरेदाखल झाले होते. अनेक आंदोलनेही झाली. संवेदनशील घटना असताना तपासात हयगय केल्याप्रकरणी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक तिवारी, ठाणेदार प्रकाश मुंडे यांचे तडकाफडकी स्थानांतरण करून पुढे निलंबन करण्यात आले. पोलिस तपास अनेक दिवस चालला. शवविच्छेदन प्रकरणावरूनही वादळ उठले होते. फॉरेन्सिक चमूने सदर अहवाल रद्दबातल ठरविल्याने शंकाकुशंकांना उधाण आले होते.