२२0 केव्हीच्या सबस्टेशनला भीषण आग

0
36

वर्धा,दि.20 : महावितरणच्या बोरगाव (मेघे) येथील २२0 बाय ६६ केव्ही सबस्टेनधील दोनपैकी एका मोठय़ा ट्रान्सफॉर्मरला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीमुळे वर्धेसह यवतमाळ जिल्ह्यातील विद्युत पुरवठा प्रभावित झाला आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नसले तरी ट्रान्सफॉर्मर क्षमतेपेक्षा अधिक गरम झाल्याने आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आग विझविण्याकरिता सायंकाळपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरूच होते.
वर्धा शहरालगत बोरगाव (मेघे) येथे महावितरणचे २२0 केव्हीचे सबस्टेशन आहे. कोराडी येथून येणारी वीज थेट याच केंद्रावर येत असल्याची माहिती महावितरणने दिली. या सबस्टेशनवरून वर्धासह यवतमाळ जिल्ह्यात वीज पुरवठा करण्यात येतो. केंद्रावर असलेल्या दोन मोठय़ा ट्रान्सफॉर्मरपैकी एक ट्रान्सफॉर्मर जळाला. यामुळे वर्धा जिल्ह्यातील पुलगाव, देवळी, वायगाव (निपाणी), भूगाव, सेलू यासह यवतमाळ जिल्ह्यात रात्रभर काळोख राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आगीची माहिती मिळताच महावितरणच्या कार्यालयात एकच धावपळ सुरू झाली. सर्वच अधिकारी सबस्टेशनवर पोहोचले. या आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता वर्धा नगर परिषद, भूगाव येथील लॉयड्स स्टील कंपनीतील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. भडकलेल्या ट्रान्सफॉर्मरवर पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात येत नसल्याचे दिसून आले. या ट्रान्सफॉर्मरमध्ये असलेल्या ऑईलला लागलेली आग भडकतच होती. अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता भूगाव येथील फोम असलेल्या अग्निशमन यंत्राचा वापर करण्यात आला. यामुळे सायंकाळी आगीवर ताबा मिळविण्यात यश आले.