23.7 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home विदर्भ जिल्हा प्रशासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कायम सोबत-आरडीसी विश्वनाथ घुगे

जिल्हा प्रशासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कायम सोबत-आरडीसी विश्वनाथ घुगे

0
47
देहदान–अवयवदानातून मानवतेचा दीप प्रज्वलित
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
वाशिम, दि. ३० डिसेंबर – देहदान व अवयवदान हे केवळ वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयुक्त नसून ते समाजातील मानवतेचे सर्वोच्च प्रतीक आहे. एका व्यक्तीचा देह अनेक रुग्णांना नवे जीवन देऊ शकतो आणि वैद्यकीय शिक्षणाला दिशा देऊ शकतो. समाजात याबाबत असलेले गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे ही काळाची गरज आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या उपक्रमाला जिल्हा प्रशासनाचे पूर्ण सहकार्य असून, अशा जनजागृती मोहिमा सातत्याने राबविल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक नागरिकाने या चळवळीत सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी. असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देहदान जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी  श्री घुगे बोलत होते.या कार्यक्रमाला वाशिम नगरपालीकेचे नगराध्यक्ष अनिल केंदळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पूरी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी केंद्राच्या अधिक्षिका डॉ. नयना सारडा, माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धूपे, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. धरमसिंग पवार, मोटार वाहन निरीक्षक गजानन हरणे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रविदास विनकरे, प्रा. राजेश घुगे, तसेच धर्मगुरू प्रज्ञापाल भंते , पंकजदेव महाराज, जनार्दन मगर, हरिदास बनसोड, सामाजिक कार्यकर्ते अविनाश मारशेटवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एन. ए. रहेमान यांनी केले. त्यांनी देहदानाचे सामाजिक, शैक्षणिक व वैज्ञानिक महत्व सविस्तरपणे उपस्थितांना समजावून सांगितले.डॉ. हर्षाली जाधव यांनी अवयवदानाबाबत मार्गदर्शन करून उपस्थितांना अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले, तर डॉ. अविनाश पूरी यांनी नेत्रदानाचे महत्व विशद केले.माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धूपे यांनी अवयवदान हे जीवनदायी कार्य असल्याचे सांगून समाजातील प्रत्येक घटकाने यामध्ये सहभाग घ्यावा, असे मत व्यक्त केले.डॉ. नयना सारडा यांनी समाजऋण फेडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे देहदान व अवयवदान असून याबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे नमूद केले.
धर्मगुरू पंकजदेव महाराज यांनी आत्मा निघून गेल्यानंतर देहाला कोणतेही मूल्य राहत नाही, त्यामुळे नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प प्रत्येकाने करावा,असे सांगत नेत्रदानाचा संकल्प जाहीर केला.प्रज्ञापाल भंते यांनी मानवी जीवनातील पंचशीलांचे महत्व सांगत मानवतेचा संदेश दिला.सामाजिक कार्यकर्ते अविनाश मारशेटवार यांनी हा अभिनव व प्रेरणादायी उपक्रम असल्याचे सांगितले, तर जनार्दन मगर यांनी ही मोहीम देशव्यापी राबविण्याची गरज व्यक्त केली.मोटार वाहन निरीक्षक गजानन हरणे यांनी अपघातग्रस्तांच्या बाबतीत अवयवदानाचे महत्व अधोरेखित करत परिवहन विभागामार्फत जनजागृतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम यांनी शवचिकित्सेसाठी देहदानाचे महत्व स्पष्ट करत, देहदान हे सर्वश्रेष्ठ दान असून स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.नगराध्यक्ष अनिल केंदळे यांनी या सामाजिक उपक्रमासाठी नगरपालिकेमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आणि आयबॅंकसाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थितांना देहदान व अवयवदान पत्रिकांचे वितरण करण्यात आले.
या जनजागृती कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी–कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डॉ. मयुरी पवार यांनी यांनी मानले.समाजात देहदान व अवयवदानाबाबत असलेल्या गैरसमजांना दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

blank