बंद लाभ पुन्हा सुरू करण्यात यावे जिल्हा परिषद सदस्य सौ.अश्विनी पटले
गोंदिया- महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक पात्र महिलांना चुकीच्या पद्धतीने झालेल्या ई-केवायसीमुळे सध्या बंद करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य सौ.अश्विनी रविकुमार पटले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा अध्यक्ष सौ.राजलक्ष्मीताई तुरकर यांनी गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ पात्र लाभार्थ्यांना सुरळीतपणे मिळत होता. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. अनेक महिलांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे ई-केवायसी करताना माहिती भरली असता, अज्ञानामुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती नोंदवली गेली. परिणामी, पात्र असतानाही अनेक महिलांचा योजनेचा लाभ बंद झाला आहे.
या संदर्भात, लाभ बंद झालेल्या महिलांच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी करून ज्या महिला पात्र आहेत त्यांचे ई-केवायसी शासकीय यंत्रणेमार्फत योग्य पद्धतीने करून, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी ठाम मागणी सौ.अश्विनी पटले यांनी केली आहे.लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना असून, अशा तांत्रिक त्रुटींमुळे कोणत्याही पात्र महिलेला लाभापासून वंचित ठेवू नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.





