सडक अर्जुनी- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे आयोजित कौशल्य शिल्पकार तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांचे हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य, सर्जनशीलता आणि नवकल्पनांचे कौतुक करताना कौशल्य विकासातूनच ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
या प्रदर्शनीत युवक-युवतींनी तंत्रज्ञान, उद्योग, नवकल्पना व कौशल्य विकासावर आधारित विविध मॉडेल्स, प्रकल्प व सादरीकरणे मांडली होती. ही प्रदर्शने पाहताना विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि नाविन्यपूर्ण विचारांचा प्रत्यय आला. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये कौशल्य संस्कृती रुजेल व आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे आमदार बडोले यांनी आपल्या भाषणात सांगितले.
ग्रामीण भागातील तरुणांनी केवळ नोकरी शोधणारे न राहता कौशल्याच्या जोरावर रोजगार निर्माण करणारे बनावे, असे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नंदकिशोर पर्वते (आय.एम.सी. सदस्य, आयटीआय अर्जुनी), राहुल अग्रवाल (आय.एम.सी. सदस्य), गुणानंद वासनिक (प्राचार्य, आयटीआय अर्जुनी), अल्लाउद्दीन राजानी (पं.स. सदस्य), रमेश चुऱ्हे (माजी जि.प. सदस्य), राजेश नंदागवळी (माजी सभापती, जि.प. गोंदिया) यांच्यासह शिक्षकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.





